Sujay Vikhe Patil : मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी, मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्सची गर्दी; भिकाऱ्यांच्या वक्तव्यावर सुजय विखे ठाम
Sujay Vikhe Patil On Shirdi Prasadalaya : मोफत जेवणामुळे शिर्डीत राज्यातले सारे भिकारी जमा झालेत. त्यामुळे गुन्हेगारी लोकांची वाढ होत आहे असं सांगत मोफत जेवण बंद करा अशी मागणी सुजय विखेंनी केली होती.
अहिल्यानगर : भिकारी याचा अर्थ भिकारीच, शिर्डीतील मोफत जेवणामुळे जे साईभक्त नाहीत अशा अपराधी आणि मोस्ट वाँटेड क्रिमिनल्सची वाढ होतेय असं म्हणत माजी खासदार सुजय विखेंनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. साईभक्त आमच्यासाठी आदरणीय असून त्यांना हिणवण्याचा प्रयत्न करत नाही. पण शिर्डीतील माझ्या महिला-भगिनी सुरक्षित ठेवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे असंही ते म्हणाले. शिर्डी संस्थानने मोफत जेवण बंद करून त्यातून आकारलेल्या पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी करावा अशी मागणी त्यांनी केली. शिर्डी येथील प्रसादालयात मोफत भोजन दिल्याने राज्यातील सर्वच भिकारी शिर्डीत गोळा झालेत असं वादग्रस्त वक्तव्य सुजय विखे यांनी केलं होतं. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.
मोफत जेवणामुळे मोस्ट वाँटेड क्रिमिनल्स शिर्डीत
मराठी भाषेमध्ये प्रत्येकजण वेगवेगळे अर्थ काढतो. मागील 3 वर्षांत शिर्डीतील 4000 हजार भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवलं आहे. भिकारी याचा अर्थ भिकारीच जे पोलिसांच्या अहवालात सांगितलं आहे. शिर्डी विधानसभेत मला माझ्या महिला-भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. साई संस्थानला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की संस्थांनाच्या प्रसादालयातील आकारलेल्या पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी व्हावा.
साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोक, मोस्ट वाँटेड गुन्हेगार, जे साईभक्त नाहीत त्यांची वाढ होतेय. याचा त्रास ग्रामस्थांना होतोय.
नेमकं काय म्हणाले होते सुजय विखे?
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी ते पैसे वापरावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली. मात्र ही मागणी करतेवेळी सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. शिर्डी संस्थानच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, राज्यातील सगळे भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत गोळा झालेत असं सुजय विखे म्हणाले. दरम्यान, सुजय विखेंच्या या वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली.
पिता-पुत्रांमध्ये मतभेद
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवणावरुन विखे पिता-पुत्रांमध्ये मतभेद पाहायला मिळतोय. शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी ते पैसे वापरावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली. प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, राज्यातील सगळे भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत गोळा झालेत या सुजय विखेंच्या वक्तव्यावर त्यांचे वडील आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखेंनी प्रतिक्रिया दिली. सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला असून मोफत जेवण बंद होणार नाही असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं. तर यावर साईभक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करत नाहीये, मी माझ्या वक्तव्यावर ठाम राहणार असं स्पष्टीकरण सुजय विखेंनी दिलं.
ही बातमी वाचा :