'राऊतांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं, गाड्या, हेलिकॉप्टरसाठी पैसे कुठून येतात?'; सुजय विखेंचा पलटवार
संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारावं की, त्यांचे नेते किती कोटींच्या गाडीत फिरतात, त्यांचे नेते जे हेलिकॉप्टर वापरतात ते पैसे कुठून येतात, असे सुजय विखेंनी म्हटले आहे.
Sujay Vikhe Patil on Sanjay Raut : संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारावं की त्यांचे नेते किती कोटींच्या गाडीमध्ये फिरत आहेत, त्यांचे नेते जे हेलिकॉप्टर वापरत आहेत ते पैसे कुठून येतात. या सर्व गोष्टींची उत्तर त्यांना देखील द्यावे लागेल, असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी भाजप नेत्यांना महागड्या गाड्या वापरू नका असा सल्ला दिला होता , यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवरती निशाणा साधत भाजपचे 90 टक्के नेते आलिशान गाड्या वापरतात, भाजपच्या नेत्यांचे महागडे सूट उतरवायचे जनतेने ठरवले आहे, अशी टीका केली होती. यावरून खासदार सुजय विखे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ज्यांच्या नेत्यांकडे कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाचे साधन नसताना कोविडच्या पैशातून महागड्या गाड्या वापरतात आणि दौरे करतात त्यांनी इतरांना प्रश्न विचारू नये, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.
...म्हणून संजय राऊतांची तळमळ
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांनी (Ajit Pawar) मुंबईचा सौदा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून ज्यांनी मागच्या चाळीस वर्षांपासून मुंबई विकली त्यांनी काही ठेवले आहे का विकायचे? मात्र आज जो विकास सुरू आहे. त्या विकासाबाबतचे पैसे त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांची ही तळमळ आहे, असा टोला सुजय विखे यांनी लगावला आहे.
संजय राऊतांचं बोलणं हास्यास्पद
आम्ही एका बापाचे आहोत, बाळासाहेब ठाकरे आमचे बाप, भाजपच्या बापाचा पत्ता आहे का? भाजपला 10 बाप आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता. यावर सुजय विखे पाटील म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे आदरस्थान आहेत. भारतीय जनता पार्टीचा कोणताही असा नेता नाही जो बाळासाहेब ठाकरे यांना वेगळ्या उपमा देतात. हिंदुहृदय सम्राट हे एकच होते आणि एकच राहणार. मात्र, त्यांच्याबद्दल कोणी हक्क सांगणे हे चुकीचे असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आयुष्यभर लढले, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते ते बसलेत. त्यांनी हे बोलावं हे हास्यास्पद असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील शेवटचा डाव टाकतील
सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पक्ष पळवण्याची स्पर्धा सुरू असून वेळ आल्यावर शरद पवार हे शेवटचा डाव टाकतील, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले होते. यावर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जयंत पाटील शरद पवार यांच्या बरोबर किती दिवस थांबणार ते विचारून घ्या, नाही तर शेवटचा डाव ते टाकतील, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.
काँग्रेस पक्षच संपुष्टात येणार
शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर सुजय विखे यांनी आता काँग्रेस पक्षच काही दिवसांनी संपुष्टात येणार आहे. खरंच काँग्रेस पक्षाने विलीन व्हावं की नाही हा त्यांच्यावरच्या काँग्रेस पक्षाचा प्रश्न असल्याचे म्हणत जो काही निर्णय होईल तो सर्वांना कळेल, असे त्यांनी म्हटले.
मित्र राष्ट्रांच्या मागणीनुसार कांदा निर्यात केली जाणार
कांदा निर्यात बंदी उठवली की नाही यावरून संभ्रमाची अवस्था आहे, तसा कोणताही जीआर निघाला नसताना कांदा निर्यात बंदी उठवली असल्याचे सुजय विखेंनी सांगितल्याने त्यांच्यावर टीका होत होती. मात्र निर्यात बंदी उठवली असल्याच्या वक्तव्यावर सुजय विखे ठाम आहेत. केवळ ओपन एक्सपोर्ट सुरू झाले नसून, मित्र राष्ट्रांच्या मागणीनुसार कांदा निर्यात केली जाणार असल्याचे सुजय विखेंनी म्हटले आहे. तसे प्रत्येक देशाचे स्वतंत्र नोटिफिकेशन निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा