Shirdi: साईभक्तांना आरती पास काऊंटरवर मिळणार, ग्रामस्थ आणि साईमंदिर प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्तांच्या फसवणुकीचे प्रकार देखील समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे
शिर्डी : साई भक्तांसाठी (Shirdi) एक दिलासादायक बातमी समोर आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांना आता आरती पास काऊंटरवर मिळणार आहे. ग्रामस्थ आणि साईमंदिर प्रशासनाचा बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . दर्शनपास व आरती पासचा काळाबाजार रोखण्या बरोबरच साईभक्तांना होणार त्रास कमी करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून साईबाबा संस्थान बरोबर झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मांडल्या आहेत. या बैठकीत भक्तांना शिफारशीने दिले जाणारे आरती पास आता थेट दिले जाणार असून ग्रामस्थांसाठीही विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर उत्सव काळात लाखो साईभक्त येतात. झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्तांच्या फसवणुकीचे प्रकार देखील समोर आले आहेत. काही सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर आरती पास घेण्यासाठी लागणारी शिफारस यामुळे भक्तांची लूट होत असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आलं. या सगळ्या मुद्यांना हात घालत ग्रामस्थांनी साईसंस्थान बरोबर बैठक घेत सगळ्या मागण्या मांडल्या आहेत.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता साईभक्तांना दर्शन अधिक सुकर व सोपा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांना दर्शनासाठी वेगळे प्रवेशद्वार ठरविण्यात आले असून या ठिकाणाहून फक्त ग्रामस्थांनाच नोंद करून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच आरती पास घेण्यासाठी लागणारी शिफारस सुद्धा रद्द करण्यात येणार असून आता भाविकांना थेट आरती पास मिळेल अशी माहिती राहुल जाधव यांनी दिली आहे.
बैठकीत झालेले निर्णय
- शिर्डी ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून मिळणार दर्शनासाठी प्रवेश
- ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही
- साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी
- साईभक्तांना आरती पाससाठी शिफारशीची गरज नसणार
- पास काऊंटरवर शिफारस विनामिळणार आरती पास
- साईसंस्थान कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
- साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर लवकरच तदर्थ समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येऊन अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याने आगामी काळात प्रभावीपणे निर्णय राबविल्यास साईभक्तांना अधिक सुकर दर्शन मिळेल यात शंका नाही