हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
साईबाबांच्या पुजेला 2014 सालापासुन विरोध सुरू झाला आहे, त्यावेळेचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी हिंदुंनी साईबाबांना देव मानू नये आणि त्यांची पुजा करू नये असं आवाहन केलं होत.
अहमदनगर : वाराणसी येथे सनातन सरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मुर्ती हटवल्याने नविन वाद उफाळुन आलाय. त्यानंतर, तेथे जवळपास 18 हून अधिक मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवण्यात आलीय. हिंदु धर्म शास्त्रात साईबाबांची पुजाविधी नाही, त्यामुळे साईंची पुजा करू नये अशी मागणी सनातन रक्षक दलाची आहे. या घटनेमुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केलीय. तर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झालीय. अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांच्या मूर्ती हटवणे ही दुर्देवी घटना असल्याचे सांगत याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी स्वत: चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
साईबाबांच्या पुजेला 2014 सालापासुन विरोध सुरू झाला आहे, त्यावेळेचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी हिंदुंनी साईबाबांना देव मानू नये आणि त्यांची पुजा करू नये असं आवाहन केलं होत. त्यावेळी मोठा वाद उपस्थित झाला होता. शंकराचार्य यांच्या उपस्थितीत धर्म संसद भरवण्यात आली होती, त्यातही साईबाबांची पुजा करू नये असं ठरवण्यात आले. तर, काही दिवसांपुर्वी बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी देखील साईबाबांच्या पुजेला विरोध केला होता. आता पुन्हा वाराणसीच्या घटनेनंतर वादाला नवी फोडणी मिळालीय. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय.
वाराणसीतील घटनेमुळे एकीकडे देशभरातील साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत असताना शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांनी देखील मुर्ती हटवण्याच्या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय. जे लोकं असं कृत्य करत आहेत ते अज्ञानातुन करत आहेत. साईबाबांना सर्वांत जास्त मानणारा वर्ग हा हिंदुच आहे. अशा प्रकारांमुळे हिंदू समाजात दुफळी निर्माण होत असल्याचंही काही हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटलंय.
साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव - बाळासाहेब थोरात
शिर्डीचे साईबाबा कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. साईदर्शनाने लोकांना आत्मिक शांती लाभते. साई मंदिरात धर्मनिरपेक्षता असून साईबाबा जाती धर्माच्या पलीकडचे देव असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून हा धर्माचा अतिरेक आहे. काही लोकांना चातुवर्ण आणि मनुस्मृती पुन्हा आणायची आहे. साईबाबा म्हणजे राज्यघटनेला अपेक्षित देव आहेत. हिंदू असणे वेगळे आणि हिंदुत्ववादी असणे हे वेगळं आहे. देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचा हा प्रयत्न चालल्याचं थोरात यांनी म्हटलं. तर, देशभरात अशा अनेक प्रवृत्ती असतात अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असे मत क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.