राम शिंदे आणि राधाकृष्ण विखेंचे मनोमिलन नाहीच, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच घडलं 'खुर्ची नाट्य'
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये मनोमिलन घडवल्याची चर्चा असतानाच हे खुर्ची नाट्य घडलं.
अहमदनगर : मागील काही दिवसांपासून भाजप आमदार राम शिंदे आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतंय. या दोघांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र आज हे दोन्ही नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहमदनगर दौऱ्यावेळी एकत्रित आले. त्यावेळी फडणवीस हे विखे आणि शिंदे यांचे मनोमिलन करण्यात यशस्वी झाले की काय असं वाटत असतानाच एक खुर्ची नाट्य रंगले आणि विखे आणि शिंदे यांच्यात मनोमिलन झाले की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आढावा बैठकीला आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुर्चीवर बसताच, त्यांच्या बाजूला राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बसतात. त्याचवेळी भाजप आमदार आणि माजी मंत्री राहिलेले राम शिंदे यांना खुर्ची उपलब्ध नसते. त्यामुळे ते स्टेजवरून खाली जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना रोखतात आणि त्यांच्या शेजारी एक खुर्ची उपलब्ध करून देतात. हा प्रसंग वाटताना जरी साधा वाटत असला तरी मात्र यामागे राजकीय कलगीतुरा असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मदत केल्याचा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना विखे कुटुंबियांनी म्हटलं होतं की, राम शिंदे यांनी माध्यमांसमोर या गोष्टी न बोलता पक्षश्रेष्ठींसमोर बोलाव्यात. यावरून रंगलेला कलगीतुरा आजच्या कार्यक्रमावेळी शांत झाला असावा म्हणूनच विखे-शिंदे एकत्र आले आहेत असे वाटत होते. पण त्याचवेळी पुन्हा एकदा हे खुर्ची नाट्य घडल्याने अद्याप राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांच्यात मनोमिलन झाले नसल्याचं चित्र निर्माण झालंय. मात्र याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता मी त्यांच्यामध्ये बसलो आहे, त्यांच्यात समन्वय आहे असं उत्तर दिले.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जेव्हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे हे हेलिपॅडवर उपस्थित होते त्यावेळी या दोघांमध्येही गप्पा रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे यांना विचारले असता त्यांनी देखील आमदार राम शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्यांना काहीतरी गैरसमज झाला म्हणून त्यांनी विखे कुटुंबियांबाबत आरोप करणारे वक्तव्य केलं असावं असं विखेंनी म्हटलं.
मात्र सकाळच्या टप्प्यात जरी विखे आणि शिंदे यांच्यात मनोमिलन झाले असल्याचे वाटत असले तरी आढावा बैठकीवेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेल्या विद्यमान विधानपरिषद आमदारांना खुर्ची न मिळाल्याने आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सांभाळून घेण्याची वेळ आल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलले जात असल्याची टीका केली.
राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर खापर फोडले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोटोकॉल पळाला जात नाही असा आरोप केला. विद्यमान खासदार सुजय विखे हे मागच्या रांगेत बसतात आणि टोपी उडवत माजी आमदार पुढच्या रांगेत बसतात असं म्हणत त्यांनी नाव न घेता माजी आमदार शिवाजी कार्डिले यांच्यावर टीका केली.
एकूणच काय तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगर दौऱ्यावेळी भाजपमधील नेत्यांमधील हा दुरावा दूर करून देवेंद्र फडणवीस काहीतरी मध्यम मार्ग काढून विखे शिंदे यांचे मनोमिलन घडवतील असं वाटत होतं. विखे आणि शिंदे यांच्यात समन्वय असल्याचे फडणवीस कितीही सांगत असले तरी 'खुर्ची' साठी शिंदे आणि विखेंमध्ये चाललेल्या या राजकीय कलगीतुऱ्यात खुर्ची नाट्याने फडणवीसांना मात्र खोट ठरवलंय.
ही बातमी वाचा :