(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radhakrishna Vikhe Patil : "संजय राऊतांना भरपूर शिकायचंय ते भरकटलेले नेते"; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला
Radhakrishna Vikhe Patil : संजय राऊत यांना भरपूर शिकायचं आहे. ते भरकटलेले नेते असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राऊतांच्या बेताल वक्तव्यामुळे पक्षाचं वाटोळं झालंय, असेही त्यांनी म्हटले.
Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. विखे पाटील नेमकं करतायेत काय? असा सवाल उपस्थित त्यांनी उपस्थित केला. यावर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. अहमदनगर (Ahmednagar) येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मी काय करतो ते नगर जिल्ह्यातील जनता जाणते. तुम्ही जे बेताल वक्तव्य करताय, त्यामुळे पक्षाचे वाटोळं झालंय. आता उरल्या सुरलेल्यांचा निकाल लावायचं तुम्ही ठरवलंय. राऊत यांना भरपूर शिकायचं आहे ते भरकटलेले नेते असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
आंबेडकरांचे टीका करणे कामच
लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारतरत्न जाहीर झाला हा फार्स असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आंबेडकर विरोधात असल्याचे सांगत त्यांचे कामच टीका करणे आहे. अडवणी यांच्या कार्याची संपूर्ण देशाला माहिती असून राम मंदिरासाठी त्यांनी केलेलं कार्य पूर्णत्वास गेले आहे. हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल अडवणी यांचे अभिनंदन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात आनंदाचा शिधा वाटपात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत राधाकृष्ण गमे पाटील म्हणाले की, वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने पुरवठा विभागाकडून पाथर्डी तालुक्यातील 164 रेशनिंग दुकानावरून आनंदाचा शिधावाटप करण्यात आला. रेशनिंग दुकानदाराने पुरवठा विभागाकडे जमा करायची रक्कम खाजगी व्यक्तीकडे जमा केली. मात्र, या खाजगी व्यक्तीने रेशनिंग दुकानदाराकडून मिळालेली रक्कम पुरवठा विभागाकडे जमा केली नाही. ही रक्कम जवळपास 50 लाखांची आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. पुरवठा विभागामध्ये याची सखल चौकशी करून आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही
मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. याबाबत विखे पाटील म्हणाले की, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्याचा किती हद्दीपर्यंत उपयोग करावा याची प्रत्येकाने लक्ष्मण रेषा आखली पाहिजे. दोन्ही बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामुळे सामान्य माणूस भरडत चालला आहे. त्यांना सुचत नाही नेमकं आपण काय करावे, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विखे पाटलांचे मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना आवाहन
मराठा आणि ओबीसी संघर्षावर विखे पाटील म्हणाले की, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने भूमिका बदलली नाही. ओबीसी बांधव आणि मनोज जरांगे या दोन्ही नेत्यांना आवाहन केले आहे की, राज्यात ताणतणाव निर्माण करण्यापेक्षा शांत राहावे, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा