Sarfaraz Khan News : मुंबई संघाला धक्क्यावर धक्के! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या सरफराज खानला पुन्हा दुखापत, किती दिवस क्रिकेटच्या मैदानातून बाहेर?
Mumbai Vijay Hazare Trophy News : महाराष्ट्राविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे मुंबईच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Sarfaraz Khan News : महाराष्ट्राविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे मुंबईच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पहिल्या चार सामने जिंकून दमदार सुरुवात करणाऱ्या मुंबईला विजय हजारे ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, निर्णायक लढतीतच मुंबईला महाराष्ट्राकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
या पराभवानंतर आता मुंबईसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला सरफराज खान दुखापतग्रस्त असल्याचे स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात तो मैदानाबाहेर बसला होता आणि आता ही अनुपस्थिती दुखापतीमुळेच होती, याची अधिकृत पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात सरफराज खान अनेक वेळा दुखापतीला सामोरा गेला असून, याचा फटका त्याच्या सातत्याला आणि मुंबईच्या संघालाही बसत आहे.
उत्तराखंडविरुद्ध अर्धशतक आणि गोव्याविरुद्ध विक्रमी शतक झळकावल्यानंतर सरफराज खान दुखापतग्रस्त झाला आहे. वृत्तानुसार, मागील सामन्यात त्याच्या स्नायूंना दुखापत झाली. त्यानंतर त्याचा MRI स्कॅन करण्यात आला आहे. दुखापतीची तीव्रता लक्षात घेता, सरफराज एकतर केवळ विजय हजारे ट्रॉफी (VHT) 2025–26 मुकावू शकतो किंवा रणजी ट्रॉफी 2025–26 च्या संपूर्ण दुसऱ्या टप्प्यापासून दूर राहण्याची शक्यता आहे. क्वाड दुखापतीतून बरे होण्यासाठी सौम्य ताण (ग्रेड 1) साठी अंदाजे 1-2 आठवडे आणि गंभीर दुखापत (ग्रेड 3 किंवा टेंडन फुटणे) साठी अनेक महिने लागू शकतात.
सरफराज खानची पाठ सोडत नाही दुखापत....
सरफराज खानसाठी दुखापतींचा पाठलाग काही थांबायचं नाव घेत नाही. गेल्या 12 महिन्यांत 28 वर्षीय या फलंदाजाला सलग अनेक धक्के सहन करावे लागले आहेत. बॉर्डर–गावसकर ट्रॉफी 2024–25 दरम्यान त्याच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले होते. या दुखापतीमुळे तो रणजी ट्रॉफी 2024–25 च्या दुसऱ्या टप्प्यात खेळू शकला नव्हता.
इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतर सरफराजने फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्याने सुमारे 17 किलो वजन घटवले. मात्र 2025–26 च्या घरगुती हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच बुची बाबू टूर्नामेंटमध्ये खेळताना त्याच्या जांघेच्या स्नायूंना (क्वाड्रिसेप्स) दुखापत झाली. त्यामुळे तो दुलीप ट्रॉफीला मुकला आणि इंडिया-ए तसेच कसोटी संघातील निवडीच्या संधींवरही त्याचा परिणाम झाला.
तरीही, दुखापतीतून सावरत सरफराजने दमदार पुनरागमन केले. त्याने आपले पहिले टी-20 शतक झळकावले आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025–26 मधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स (CSK)सोबत आयपीएल करार मिळवला. हीच लय त्याने विजय हजारे ट्रॉफी 2025–26 मध्येही कायम ठेवली होती. मात्र आता पुन्हा एकदा तो दुखापतीचा बळी ठरला आहे. या हंगामात सरफराज मुंबईसाठी सर्वाधिक विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक ठरला आहे. तीन डावांत त्याने 220 धावा करत मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याची अनुपस्थिती मुंबईच्या फलंदाजीवर निश्चितच परिणाम करणारी ठरू शकते.
हे ही वाचा -





















