बेटीपेक्षा बापच सवाई! वादग्रस्त प्रशासकीय कारकीर्द, निलंबनाची कारवाई, 40 कोटींची आर्थिक माया; कोण आहेत IAS पूजा खेडकरांचे वडील
Pooja Khedkar posting in Washim: पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमंती थाट आणि रुबाब चर्चेचा विषय ठरला होता. मुलीप्रमाणेच दिलीप खेडकर यांची प्रशासकीय कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.
अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) या त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. बी ई (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. दरम्यान दिलीप खेडकर,सेवा निवृत्त होताच त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत 13 हजार 749 मते मिळाली होती.
दिलीप खेडकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 40 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते, याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे दिलीप खेडकर यांची पत्नी डॉ.मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील सनदी अधिकारी होते त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती.त्यांचे एकदा निलंबनही झाले होते. दिलीप खेडकर यांना दोन अपत्य आहेत. पियुष खेडकर आणि पूजा खेडकर...पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
खेडकरांचा भाऊ भाजप पदाधिकारी, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवीला दीड किलो चांदीचा मुकूट
दिलीप खेडकर यांचे बंधू माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून दिलीप खेडकर यांनी मोहटादेवीला साकडे घातले होते. जर उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करू असं दिलीप खेडकर यांनी म्हटले होते, तो नवस त्यांनी फेडला होता.
लोकसभा निवडणुकीआधी भालगावमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंना काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने भाजपच्या तालुकाध्यक्षाच्या गावातच खासदाराचा अपमान झाल्याने माणिक खेडकर यांचे तालुकाध्यकपद काढून घेतल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर विखे आणि खेडकर यांच्या मतभेद झाल्यानेच दिलीप खेडकर यांनी वंचितकडून लोकसभा निवडणुक लढवली असल्याच्या चर्चा रंगत आहे, दरम्यान दिलीप खेडकर यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर जमीन असून ते जवळपास 60 एकर वनविभागाची जमीन कसत आहेत. मात्र, वनविभागाची जमीनदेखील गैरपद्धतीनेच ते कसत असल्याच्या चर्चा आहेत त्याबाबत अधिकृत माहिती नाही. एकूणच पूजा खेडकर प्रमाणेच वडिलांचेही वर्तन गैरपद्धतीचे असल्याचे एकंदरीत समोर येत आहे.
आणखी वाचा