(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke : उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
Nilesh Lanke Chandrahar Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी चंद्रहार पाटील यांना विजयाचं सूत्र सांगितलं आहे.
अहमदनगर : महाविकास आघाडीकडून (MVA) अहमदनगर दक्षिण (Ahmednagar South) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीतर्फे निलेश लंके (Nilesh Lanke ) यांनी निवडणूक लढवली होती. निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला. दुसरीकडे मविआतून सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, चंद्रहार पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. चंद्रहार पाटील यांनी खासदार निलेश लंके यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी निलेश लंके यांनी चंद्रहार पाटील यांना अपयश ही यशाची पहिली पायरी असते. या निवडणुकीत कुठे कमी पडलो याचा अभ्यास करुन पुढील निवडणुकीला सामोरे जा, असा संदेश निलेश लंके यांनी चंद्रहार पाटील यांना दिला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत "कही खुशी कही गम" अशी परिस्थिती राहिली कारण माझा जरी विजय झाला तरी आमचे मित्र चंद्रहार पाटील यांचा काही मतांनी पराभव झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.चंद्रहार पाटील यांनी निलेश लंके यांची अहमदनगर येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी लंके बोलत होते. अपयश ही यशाची पायरी असते आणि पैलवान हा खेळाडू वृत्तीचा असतो त्यामुळे या निवडणुकीत आपण कुठे कमी याचा अभ्यास करून चंद्रहार पाटील हे पुढील निवडणुकीला सामोरे जाऊन यश मिळवतील, असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्हयातील विधानसभेच्या दोन जागा या आमच्याच आहेत. त्यामुळे त्या मिळवण्याचा विषयच येत नाही त्या आमच्याच जागा आहेत त्यामुळे त्या आम्हीच लढवणार, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून मविआत दावे प्रतिदावे सुरु आहेत. चंद्रहार पाटील यांना त्याबाबत विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सोबतच लोकसभेत जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी पक्ष श्रेष्टींनी दखल घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्रितपणे लढेल आणि लोकसभेत मविआला जसे यश मिळाले तसेच यश मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. आटपाडी खानापूर आणि मिरज विधानसभा मतदारसंघावर चंद्रहार पाटील यांनी दावा केला.
संबंधित बातम्या :