(Source: Poll of Polls)
Chhagan Bhujbal : वेगळा विचार करुन काही तरी ठोस निर्णय घ्या, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची भुजबळांकडे मागणी
Samata Parishad: राज्यसभेला नावाची चर्चा असताना भुजबळांना नाकारण्यात आले त्यामुळे कुठेतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतून मोठी बातमी समोर येत आहे. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, इच्छुक असतानाही लोकसभेला न मिळालेलं तिकीट, राज्यसभेला डावललं जाणं या मुद्द्यांमुळं भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भुजबळांनी आतातरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मुंबईतल्या एमईटी सेंटरमध्ये आज छगन भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेची (Samata Parishad) बैठक झाली.
मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीला समता परिषदेचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. य बैठकीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. छगन भुजबळांवार अन्याय होत असल्याचा भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. पक्षामध्ये कुठेतरी अंतर्गत गटबाजी आहे. राज्यसभेला नावाची चर्चा असताना भुजबळांना नाकारण्यात आले त्यामुळे कुठेतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
भुजबळांनी आतातरी ठोस भूमिका घ्यावी, कार्यकर्त्यांची मागणी
दुसरीकडे तुम्ही सरकारमध्ये असला तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आक्रमकपणे मुद्दा लावून ठेवावा लागेल. जेणेकरुन मराठा आरक्षण ओबीसीतून दिले गेले नाही पाहिजे. मराठा आरक्षणाचा फटका ओबीसी बसता कामा नये यासाठी आक्रमक भूमीका मांडा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भुजबळांनी आतातरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. इतकंच नाही तर बैठकीतून छगन भुजबळांनी अॅडव्होकेट मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार असल्याचं खुद्द छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय.
भुजबळ नाराज नाहीत : अमोल मिटकरी
अजित पवार गटाचे अमोल मिटकरी म्हणाले, छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत त्या जाणूनबुजून सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा तुतारी गट नाही आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी, कलह नाही. स्वत: भुजबळ साहेब सुनेत्रा पवारांना राज्यसभेला उमेदवारी देण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीला उपस्थित होते. समता परिषदेचा तो मेळावा होता. समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही वेगळे आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली असेल, पण भुजबळ नाराज नाहीत. हे स्वत: भुजबळांनी स्पष्ट केली आहे.