Maharashtra Assembly Elections 2024 : स्पेशल विमान पाठवूनही माघार नाहीच, विखे पाटलांची डोकेदुखी वाढली; शिर्डीत फडणवीसांची शिष्टाई निष्फळ
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी दोन पिपाडा यांना स्पेशल विमानाने बोलवून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.
शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. बंडखोरांच्या मनधरणीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले गेले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Shirdi Assembly Constituency) भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr Rajendra Pipada) यांनी बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसापूर्वी पिपाडा यांना स्पेशल विमानाने बोलवून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे. त्यामुळे आता मविआकडून प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogare), महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपकडून शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आले होते. मात्र भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले.
शिर्डीतील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पिपाडा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रयत्न केले. मात्र राजेंद्र पिपाडा हे अपक्ष निवडणूक लढण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळे आता शिर्डीत मविआकडून प्रभावती घोगरे, महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही बंडखोरी
दरम्यान, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी कायम राहिली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळे यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत सूचना केली होती. मात्र कांबळे सकाळपासून नॉट रिचेबल होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कांबळे यांनी माघार घेतली नाही. कांबळेचा अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे श्रीरामपूर विधानसभेत काँग्रेसचे हेमंत ओगले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लहू कानडे आणि शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे अशी तिरंगी पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा