Ahmednagar : विहिरी भरलेल्या, चाऱ्याचे चोख नियोजन; दक्षिण अहमदनगमध्ये दुष्काळ असला तरी हिवरे बाजार मात्र 'हिरवे'च
Hiware Bazar Water Planning Story : हिवरे बाजारमध्ये 700 पशुधन असून दररोज या ठिकाणी 5 हजार लिटर दूध संकलन होतं. इतरत्र दुष्काळाची झळ बसत असताना हिवरे बाजार मात्र हिरवेगार असल्याचं दिसतंय.
अहमदनगर : एकीकडे दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे, अनेक भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे आदर्श गाव हिवरेबाजार येथे आजही हातपंपांना पाणी आहे आणि जनावरांच्या चाऱ्याचं योग्य नियोजन करत पुढील दोन ते तीन महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. हे केवळ शक्य झाले ते पाण्याच्या योग्य ताळेबंदामुळे. हिवरे बाजारला पाण्याचा योग्य ताळेबंद ठेवता आला तो म्हणजे कुपनलिकेवरती घातलेली बंदी. तसेच कूपनलिकेचा वापर हा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आणि विहिरीचा वापर हा शेती सिंचनासाठी ठेवल्यानेच हे साध्य झालंय.
विहिरी भरलेल्या, पिकांचं चोख नियोजन
राज्याला आणि देशाला नेहमीच नवा आदर्श घालवून देणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजारमधील या विहिरींना भर उन्हाळ्यातही एवढं पाणी दिसतंय. त्याचे कारण आहे पाण्याचं आणि पिकांचं योग्य व्यवस्थापन. दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात सध्या अनेक भागात जनावरांच्या पाण्याची आणि चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे हिवरे बाजार गावातील कोणत्याही गोठ्यात गेलं तर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई दिसत नाही आणि त्याचे कारण आहे पिकांचे योग्य नियोजन.
हिवरे बाजार गावातील शेतकरी खरीप आणि रब्बीत मुरघास करून ठेवतात आणि उन्हाळ्याच्या तोंडावर शेतात केवळ फळबाग आणि चारा पीक टिकवायण्याचे उद्दिष्ट ठेवतात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हिवरे बाजारमध्ये चाऱ्याची आणि पाण्याची समस्या जाणवत नाही. हिवरे बाजार गावात जवळपास 700 एवढे पशुधन आहे आणि 5 हजार लिटर दूध संकलन होते. मात्र उन्हाळ्याच्या आधी संपूर्ण गावातील शेतकरी कोणताही हव्यास न ठेवता केवळ चारा पीक जागवतात आणि फळबाग जगवतात इतर कोणतेही पीक करत नाही. त्यामुळे त्यांना पाणी आणि चाऱ्याची समस्या भासत नाही.
गावात कुपनलिका घेण्यावर बंदी
हिवरे बाजार गावात भर उन्हाळ्यातही विहिरींना पाणी असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे कूपनलिका घेण्यावर बंदी. गावात पूर्वीपासून असणाऱ्या कूपनलिका या माणसांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जातात , तर विहिरी या शेती सिंचनासाठी वापरल्या जातात. गावात सध्या 415 विहिरी आहेत. त्यांना 35 ते 40 फूटावर पाणी आहे. या पाण्याचे योग्य नियोजन केल्याने आज गावात 92 कोट्यधीशांची संख्या असल्याचे आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार सांगतात.
भूजल नियमन कायदा अस्तित्वात आहे, त्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून 500 मीटरपर्यंत कूपनलिका घेतल्या जाऊ शकत नाही. मात्र सध्या सर्वत्र कुपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचा भौगोलिक स्थितीवर परिणाम होत असल्याचं पोपटराव पवार सांगतात. भविष्यात कुपनलिका घेण्याचे प्रमाण कमी न झाल्यास रब्बीतही पाण्याचे आणि चाराची समस्या निर्माण होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच गावामध्ये कुपनलिका घेतल्या जात नाहीत आणि विहिरींचे पाणी हे शेती सिंचनाला वापरताना देखील ठिबकचा वापर केला जातो.
पिण्याच्या पाण्याच्या आणि जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येबाबत केवळ उन्हाळ्यातच चर्चा होते. मात्र एरवी राज्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता देखील त्याबाबत उपाययोजना करण्यात फारसा रस घेताना दिसत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भविष्यातील धोके लक्षात घेऊन आदर्श गाव हिवरे बाजारसारखी आधीच पूर्व तयारी केली तर समस्या निर्माण होणार नाही.
ही बातमी वाचा: