Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
Raosaheb Danve : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सुरु आहे. हरियाणात भाजपला मोठं यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर : हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryana Assembly Election Result 2024) मतमोजणी आज सुरु आहे. सुरुवातीला हरियाणामध्ये मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले. मात्र काही वेळाने ट्रेंड बदलत गेला आणि भाजप (BJP) आघाडीवर आल्याचे पाहायला मिळाले. सध्या भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यावर आता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.आतापर्यंत आलेल्या कलानुसार, विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 34 मतदारसंघांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर लोक दल 2 आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप (BJP) सत्ता स्थापन करेल.
काय म्हणाले रावसाहेब दानवे ?
हरियाणा येथील विधानसभा निकालावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी छत्तीसगड, राजस्थानमध्ये देखील वृत्तवाहिन्यांनी सांगितलं होतं की, भाजपचे पीछेहाट दिसेल. मात्र, त्यावेळी देखील मी म्हटलं होतं की, तसं होणार नाही. तसेच हरियाणाबाबत देखील वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला पीछेहाट दाखवत होते. मात्र तसं घडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा असा एक वर्ग आहे जो सभेत आणि रस्त्यावर दिसत नाही. मात्र त्यांच्या प्रपंचात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जी सरकारी मदत होते, त्यामुळे असा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मागे उभा राहतो, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कौल आम्हाला मान्य : रावसाहेब दानवे
हरियाणासारखीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील होईल, असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कौल आम्हाला मान्य आहे. केवळ निवडणुकीसाठी भाजप राजकारण करत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळावा, सर्वांना सारखा न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी काम करते. जरी पिछेहाट दिसत असली तरी तेवढी पिछेहाट आमचे झालेले नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या