(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय म्हणता? मंडप अन् डेकोरेशनवाल्यांचं अधिवेशन भरलंय... शिर्डीत तीन दिवस मंथन
साईंबाबांच्या शिर्डीत मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांचं तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
Mandap Decoration Adhiveshan Shirdi: कोरोना काळात (Corona cases) अनेक निर्बंध आले मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही सर्वाधिक आर्थिक फटका बसलेला उद्योग अर्थातच मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिक. साईंबाबांच्या शिर्डीत या व्यावसायिकांचं तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
कोरोना काळात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या मंडप-डेकोरेटर्स कामगार आणि व्यावसायिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, मंडप व्यावसायिकांना एमआयडीसीमध्ये जागा मिळावी, अटल आहार योजना लागू करावी, प्रत्येक अधिवेशनाला सरकारचे अनुदान मिळावे, अशा विविध मागण्या या अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
विवाह सोहळे असो की राजकीय कार्यक्रम मंडप आणि डेकोरेटर्स यांच्याशिवाय ते कार्यक्रम पूर्णच होत नाहीत. इतक्या महत्त्वपूर्ण बनलेल्या या व्यवसायावर कोरोना काळात मोठे संकट आले होते. सुरुवातीला विवाह सोहळे, धार्मिक तसेच राजकीय कार्यक्रमांना बंदी आणि त्यानंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली. त्यामुळे मंडप आणि डेकोरेटर्स व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते.
पाच वर्षांपूर्वी असोसिएशनची स्थापना झाली, मात्र कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीनंतर संघटितपणे शासन दरबारी आपली बाजू मांडली जावी याची निकड जाणवल्याने गेल्या वर्षभरात संघटनेने राज्यातील मंडप आणि डेकोरेटर्स यांना एका छताखाली आणून मोठी ताकद बनवली. त्याच माध्यमातून साईबाबांच्या शिर्डीत पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे अधिवेशन तीन दिवस चालणार असून याचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडप व डेकोरेटर्स असोसिएशनने राज्यभरात मोठे संघटन निर्माण करून सरकारला दखल घ्यायला भाग पाडले. संघटनेच्या विविध मागण्यासह कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील मंडप आणि डेकोरेटर्स यांच्या कार्याला दात देत सकारात्मक प्रतिसाद दाखवला.
आचारसंहिता असल्याने मी आत्ताच काही घोषणा करू शकत नाही मात्र आचार संहिता संपताच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एक स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करून निर्णय घेऊ असे सामंत यांनी आश्वासन दिले. त्यामुळे शासन प्रशासनाच्या लेखी नेहमीच उपेक्षित राहिलेल्या या व्यवसायाला एक नवी ओळख देण्याचे काम साईबाबांच्या शिर्डीतून मंडप व डेकोरेटर्स असोसिएशनने केले एवढे मात्र नक्की.