(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News: फी न भरल्याने चिमुकल्यांना शाळेबाहेर ठेवले, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार
अहमदनगर शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून मागील चार ते पाच दिवसांपासून शाळेच्या गेटच्या बाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहमदनगर: शाळेचे शैक्षणिक शुल्क (School Fee) भरले नाही म्हणून एका विद्यार्थ्याला चार ते पाच दिवसांपासून शाळेच्या गेट बाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील नामवंत खासगी इंग्रजी शाळांची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे.
अहमदनगर (Ahmednagar News) शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून मागील चार ते पाच दिवसांपासून शाळेच्या गेटच्या बाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनंती करून देखील विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवलं जातं असल्याचं पालकांचे म्हणणे आहे. लाखो रुपये फी भरून देखील किरकोळ फी बाकी आहे. ती फी देखील भरण्याची पालकांची तयारी असताना विद्यार्थ्यांना बाहेर ठेवलं जातं असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सकाळी विद्यार्थी नेहमीप्रमाणे आठ वाजता शाळेत येतात. मात्र ज्यांच्याकडे गेट पास नाही त्यांना शाळेत घेतलं जातं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर थांबावे लागते. दुपारी दोन नंतर जेव्हा स्कुल बस येते तेव्हा ही मुले पुन्हा घरी निघून जातात. या दरम्यान विद्यार्थी हे शाळेच्या बाहेरच असतात त्यामुळे या काळात मुलांसोबत काही घटना घडली तर त्याला नेमकी कोण जबाबदार? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारण्यात येत आहे. तर काही विद्यार्थ्याच्या पालकांनी तर दोन दिवसात फी देतो असं सांगून देखील त्यांच्या पाल्याला बाहेर ठेवल्याने पालकांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे
या घडलेल्या प्रकाराबाबत शाळेच्या वतीने कोणतेही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मनसेचे सचिव नितीन भुतारे यांना माहिती मिळताच शाळेच्या गेटवर ठिय्या मांडला होता. शाळेकडून अशा पद्धतीने मनमानी केली जात असल्याचे म्हणत त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. मात्र हा शाळा व्यवस्थापनाचा निर्णय असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले असल्याचे भुतारे म्हणाले. शाळेत झालेल्या घटनेनंतर आज शाळेच्या गेटवर बाउन्सर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी संबंधित शाळेला नोटीस काढली जाईल असं उत्तर दिलंय. मात्र चार ते पाच दिवस विद्यार्थ्यांना बाहेर ठेवल्याने त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार हा खरा प्रश्न आहे.