(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : आंबीखालसा ग्रामपंचायतीचं क्रांतिकारी पाऊल, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी 16 हजारांचे अनुदान
Ahmednagar News : आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत विधवा महिलांच्या पुनर्विवाहाला 16 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.`
Ahmednagar News : विधवा (Widow) महिलांनाही समाजात जगताना मानसन्मान मिळावा यासाठी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा या ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विधवा महिलांच्या पुनर्विवाहाला (Widow Remarriage) 16 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. असा निर्णय घेऊन आंबीखालसा ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी आंबीखालसा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आणि सरपंचपदी बाळासाहेब ढोले विराजमान झाले. त्यांनी गावातील महिलांच्या उन्नतीसाठी आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महिला महासंघामार्फत 36 बचतगटांची स्थापना केली. त्या माध्यमातून बचतगटांना कर्ज उपलब्ध करुन देत पूरक उद्योगांची उभारणी करुन दिली आहे. नुकत्याच झालेल्या मासिक सभेत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल तिथे महिला बालकल्याण समितीतर्फे मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी एक हजार रुपये आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहनासाठी 16 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे अनेक तरुण विवाहित जोडप्यांचे सहजीवन अडचणीत आले आहेत. त्यातच अलीकडच्या काळात विवाहित तरुणांचे व्यसनाधीनतेने आणि अपघाताने मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या पश्चात त्याच्या सहचारिणीचे उर्वरित जीवन हलाखीचे होते. या समस्येला छेद देण्यासाठी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचा हा निर्णय घेतला असल्याचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी सांगितलं आहे.
आजही विधवा महिलांना समाजात मानसन्मान नाही
आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे पालन केले जाते. विधवा महिलांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने व्यापक जनजागृती करावी लागत आहे. याचाच एक भाग म्हणून संगमनेरमधील आंबीखालसा ग्रामपंचायतीने विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी 16 हजार रुपयांचे अनुदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विधवा महिलांना सन्मानाचे आयुष्य जगता यावे यासाठी राजर्षि शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात 26 जुलै 1917 रोजी विधवा पुनर्विवाह कायदा केला होता. त्याला 105 वर्षे पूर्ण होत आहेत. तर महात्मा जोतिबा फुले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात 15 जून 1869 रोजी पुण्यातील गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह पार पडला होता.
इतर महत्त्वाची बातमी
Kolhapur : विधवांनाही सन्मानाचं जीवन जगता येणार, विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाड ग्रामसभेचा ठराव