Ahmednagar News : अहमदनगरमधील सीना नदीत सोडले हजारो लिटर केमिकल, कारवाई कागदावरच, नागरिकांना श्वसनाचा त्रास
Ahmednagar News : अहमदनगरमधील सीना नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्याने पेट्रोल आणि गॅससारखा उग्रवास सुटला आहे.
अहमदनगर : एकीकडे राज्यातील महत्वाच्या शहरात प्रदूषणाचा (Pollution) विळखा वाढत असताना अनेक शहरातील नद्याही प्रदूषणाच्या (River Pollution) कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) सीना नदीची देखील अशीच अवस्था झाली असून नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने पेट्रोल आणि गॅस सारखा उग्रवास सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आजुबाजुंच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
अहमदनगर शहरातून वाहणारी सीना नदी (Ahmednagar Sina River) शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात या नदीला बकाल स्वरूप (Sina River Pollution) आले असून, आजूबाजूला असलेल्या कंपनीचे केमिकल पाणी थेट नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे मागील वर्षी अनेक मृत माशांचा खच नदीच्या काठावर आढळून आला होता. आता याच नदीत केमिकलयुक्त पाणी, मेडिकल वेस्ट, कचरा आदी टाकण्यात येत असल्याने नदीच्या पाण्याला उग्र वास येऊ लागला आहे. यामुळे, आजुबाजुंच्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याने मध्यरात्री शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
अहमदनगर (Ahmednagar City) शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्रात अज्ञातांने कसले तरी केमिकल (Chemical) सोडले. त्यामुळे धर्माधिकारी मळा परीसरात दुर्गंधी सुटून नागरिकांच्या डोळ्याला जळजळ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. त्यावेळी नदीपात्रातील पाण्यावर तेलकट थर नागरिकांच्या नजरेस पडला. नागरिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. महापालिकेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली, तर नायब तहसीलदार तसेच स्थानिक नगरसेवक देखील घटनास्थळी आले. नगर एमआयडीसी परिसरातील एखाद्या कंपनीने नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी नदी पात्रात सोडले असावे असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पाण्याचे नमुने घेणं अपेक्षित मात्र....
दरम्यान, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पुन्हा नदीपात्राच्या परिसरात पाहणी केली. नदीपात्रात नेमकं कुणी काय आणून टाकले? याबाबत चौकशी सुरू असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने घेणं अपेक्षित असताना तशी कोणतेही करावाई झालेली नाही. याबाबत कागदोपत्री कोणतेही करावाई होत नसून केवळ तोंडी सूचना दिल्या जात आहेत. त्यातच केवळ महसूल विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस विभाग यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यामुळे मुख्य प्रश्न मार्गी लागणार का? हा देखील प्रश्नचं आहे. संबंधित प्रशासनाने त्वरित या घटनेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाईची करण्याची मागणी धर्माधिकारी मळ्यातील नागरिकांनी केली आहे. तसेच भविष्यात पुन्हा अशा घटना होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
इतर महत्वाची बातमी :