Ahmednagar : 100 वर्षापासून वास्तव्य, आता सांगा दादा आम्ही कुठं जायचं, श्रीरामपूरमध्ये रेल्वे मार्ग विस्तारीकरणासाठी स्थानिकांना नोटिसा
Ahmednagar News : श्रीरामपूर शहरात 100 वर्षापासून वास्तव्य असताना व स्वतःच्या नावे उतारे असताना रेल्वे विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील (Srirampur) बेलापूर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शहरातील तब्बल 1500 हुन घरे व व्यावसायिकांना घरे व दुकाने खाली करण्याच्या नोटिसा रेल्वे विभागाने बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे. 100 वर्षापासून वास्तव्य असताना व स्वतःच्या नावे उतारे असताना रेल्वे विभागाने बजावलेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
श्रीरामपूर शहरातील बेलापूर रेल्वे स्थानकाच्या (Belapur Railway Station) परिसरातील 5 किमीच्या अंतरावरील घरे व व्यावसायिकांना रेल्वे मार्ग विस्तारीकरण करण्यासाठी 1500 हुन अधिक घर मालक व व्यावसायिकांना नोटिसा (Notice) बजावल्या असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पीपीई ऍक्ट 1971 नुसार या नोटिसा बजावण्यात आल्या असून यापूर्वी एकही नोटीस न देता थेट कलम 5 नुसार घरे व दुकाने खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या भागात अनेक ठिकाणी 100 वर्षांपासून वास्तव्य असणारे नागरिक राहतात. अनेकांच्या नावे स्वतःचे उतारे सुद्धा आहेत. तर शहराचा डीपी प्लॅनसुद्धा मंजूर असून झालेली बांधकामे नियमानुसार परवानगी घेऊन करण्यात आली आहेत. अस असताना अचानक आलेल्या नोटिसमुळे स्थानिकांना केंद्र व राज्य शासन न्याय देणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
गेल्या महिन्यात अखेरीला या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर आता नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना याबाबत निवेदन देण्यात आले असून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची विंनती केली आहे. माझ्याकडे नागरिक आले असून आम्ही दोन्ही खासदार एकत्र येऊन बैठक घेऊ अस आश्वासन खासदार सुजय विखे यांनी दिलं आहे. रेल्वेमार्गाचं विस्तारीकरण करून रेल्वेची चाके मजबूत करत असताना अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या अनेक संसाराची चाके मात्र अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राज्य व केंद्र सरकार यात काय मार्ग काढणार याकडे श्रीरामपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दोन स्थानके एकमेकांच्या समोरासमोर
अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यात बेलापूर आणि श्रीरामपूर अशी दोन स्थानके एकमेकांच्या समोरासमोर आहेत. यामुळे अनेकदा प्रवाशांचा गोंधळ उडतो. कारण दोन्ही स्थानके समोरासमोर असल्याने कोणती गाडी कुठे आली, हे अनेकदा प्रवाशांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक नवख्या प्रवाशांची तारांबळ पाहायला मिळते. बेलापूर रेल्वेस्थानक हे दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर दौंड आणि मनमाड / शिर्डी दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.
इतर महत्वाची बातमी :