(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar : जखणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय, जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव, असा निर्णय घेणारी पहिली ग्रामपंचायत
Ahmednagar News : अहमदनगर तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायतने गावातील जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव घेतला आहे.
अहमदनगर : एकीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून राज्यभरात तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच अहमदनगर (Ahmednagar) तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायतने गावातील जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव घेतला आहे. जखणगावच्या ग्रामसभेत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असून मराठा आरक्षण- धनगर आरक्षण (Maratha Andolan) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जखणगाव ग्रामपंचायतने ग्रामसभा बोलावली होती. त्यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षण मागणीवरून राज्यभरात असंतोष पसरला असून ठिकठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात आली आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला असून कडकडीत बंद सह आंदोलने, मोर्चे काढले जात आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा देखील उपस्थित झाला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील राज्यात जातीनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी सूचना केली होती. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील जखणगाव ग्रामपंचायतीने याच पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण ठराव जातीनिहाय जनगणना (cast Wise Census) करण्याचा ठराव केला आहे. बहुदा असा निर्णय घेणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असावी, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील जखणगाव ही हजार पंधराशे लोकवस्तीची ग्रामपंचायत असून मराठा-धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंयातीने एक ग्रामसभा (Gramsabha) घेतली. या ग्रामसभेत हा ठराव करण्यात आला आहे. या संदर्भातील ठरावाचे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ठरावानुसार जखणगाव ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्येची जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. त्यानुसार नऊ नोव्हेंबरपर्यंत ही जनगणना करून मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवणार असल्याची माहिती गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ.शंकरप्रसाद गंधे यांनी दिली आहे. जनगणना करण्याचे काम ग्रामपंचायतच्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाणार आहे. यासाठी 35 कर्मचारी काम करतील, त्याचबरोबर कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर करण्यात यावा, असं सांगण्यात आलं आहे.
विळद गावात रास्ता रोको आंदोलन
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना पाठिंबा देण्यासाठी विळद गावात रास्ता रोको आंदोलन आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला आहे. सरकारने त्वरित मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने आज अहमदनगरच्या विळद या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेल आहे. हा रस्ता शिर्डीकडून पुढे अहमदनगर शहरांमध्ये जाणारा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावर तीव्र आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत आहे तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका ही सकल मराठा समाजाच्या वतीने घेतले जाते आहे. भगवेमय वातावरण झालं आऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे.