Udhhav Thackeray : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, असा आहे दौरा!
Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) येत्या आठ सप्टेंबर रोजी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत.
अहमदनगर : सध्या राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती (Maharashtra Drought) निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. असलेली पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) मैदानात उतरले असून येत्या आठ सप्टेंबर रोजी अहमदनगर (Ahmdnagar) जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत.
पावसाचा (Rain) सप्टेंबर महिना सुरु झाल्यानंतरही अद्याप समाधानकारक पावसाचा पत्ता नाही. राज्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने रखरखत्या उन्हाची दाहकता सहन करावी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे पिके करपून जाऊ लागली आहेत. जूनमध्ये झालेल्या पावसाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली, मात्र त्यानंतर पाऊसच गायब झाल्याने आता पिकांना तांब्या तांब्याने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशातच नाशिकसह (Nashik) अहमदनगर जिल्ह्यातही दुष्काळसदृश्य परिस्थिती असून पाऊस नसल्याने धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. येत्या आठ सप्टेंबर रोजची उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटातील अनेक नेते पाहणी दौऱ्यावर असणार आहेत. यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकारला सांगणार आहे.
असा असणार ठाकरेंचा दुष्काळ दौरा
उद्धव ठाकरे हे दुष्काळी दौऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात येत असून हा एकदिवसीय दुष्काळी दौरा असणार आहे. यात ते सकाळी 8 सप्टेंबर रोजी सकाळी शिर्डी (Shirdi) विमानतळावर उतरतील. त्यानंतर राहता तालुक्यातील राऊत वस्ती, कोलवड गाव या ठिकाणी पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत. यात कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी उद्धव ठाकरे जातील. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतील, अशी माहिती आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यासोबतच ठाकरे गटाचे काही नेते सुद्धा सोबत असणार आहेत. नगर जिल्ह्यातील जो काही दुष्काळग्रस्त भाग आहे, जिथे अद्यापही पाऊस नाही, शेतकरी अडचणीत आहेत, अशा शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत.
दुष्काळासंदर्भात शरद पवारांचा सरकारला सल्ला
राज्यात दुष्काळसारखी स्थिती असून दुबार पेरणीचे संकट उभ राहिले आहे. दुबार पेरणी केली तरी पीक वाचेल की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे सरकारने याबाबत काळजीपूर्वक पावलं उचलली पाहिजेत. अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या देखील उभी राहिली आहे, यावर वेळीच काही खबरदारी घेतली नाही तर काही दिवसांनी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. काही दिवसांपुरता चारा शिल्लक असल्याचा शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस न आल्यास शेतकऱ्यांकडे चाऱ्याचं मोठं संकट उभं राहू शकतं, त्यासाठी राज्य सरकारने चारा डेपो करणे आवश्यकता असल्यास अनेक ठिकाणी चारा छावण्या उभारणं हे काम करणं आवश्यक आहेत.