Adipurush : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली; 'आदिपुरुष'च्या शूटिंगला ब्रेक
Prabhas Health Issue : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे 'आदिपुरुष' चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागत असल्याचं सांगण्यात येत आहे.
![Adipurush : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली; 'आदिपुरुष'च्या शूटिंगला ब्रेक Adipurush prabhas south superstar health issue adipurush shooting break for some time marathi news Adipurush : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली; 'आदिपुरुष'च्या शूटिंगला ब्रेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/5f0bb4425e507191f5950731faf77d021675945746066358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prabhas Health Issue : साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज सुपरस्टार अभिनेत्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात प्रभासचं (Prabhas) नाव आवर्जून घेतलं जातं. दरम्यान, प्रभासबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रभासची तब्येत काही दिवसांपासून बरी नाहीये. त्यामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात येणाऱ्या 'आदिपुरुष' (Adipurush) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच थांबवावं लागलं आहे.
प्रभासची तब्येत बिघडली
एन्टरटेनमेंट टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, अलीकडे प्रभासची तब्येत अचानक बिघडली आहे. जास्त ताप असल्यामुळे बाहुबली फेम अभिनेता प्रभासला आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रभासलाही रुग्णालयात दाखल व्हावे लागले. प्रभासवर उपाचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
प्रभास पूर्णपणे बरा झाल्यानंतरच 'आदिपुरुष'च्या सेटवर येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभास लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. प्रभासने 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या चित्रपटांद्वारे चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
'या' चित्रपटांमध्ये प्रभास दिसणार आहे
प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. पण 'आदिपुरुष' व्यतिरिक्त प्रभासचे असे आणखी दोन चित्रपट आहेत, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. खरंतर त्यात 'केजीएफ' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा 'सालार' आणि दिग्दर्शक नाग अश्विनचा 'प्रोजेक्ट के' यांचा समावेश आहे. 'प्रोजेक्ट के' चित्रपटात प्रभास बी-टाऊन अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार असल्याची माहिती आहे.
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)