एक्स्प्लोर
Advertisement
यशोगाथा : जिवलग मित्रांचा शेळीपालन व्यवसाय
कोल्हापूर : कोल्हापुरात जिवलग मित्रांनी विश्वास आणि बांधिलकीने शेतीपूरक शेळीपालन व्यवसाय केला आहे. जिवलग मैत्रीतून पुढं आलेला हा शेळीपालन व्यवसाय.
सांगलीचा प्रकाश माने हा तरुण आयटीआय करण्यासाठी कोल्हापुरात आला. इथचं त्याची मारुती फारकटेशी मैत्री झाली. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागं न लागता या दोघांनी व्यवसायाकडं वाटचाल सुरु केली. आधी रसवंतीगृह, नंतर आईस फॅक्टरी..असे व्यवसाय सुरु होते.. त्यातच शेळीपालनाची कल्पना आली..मात्र आर्थिक बाजू कमकुवत होती..आणि इथंच यांचा तिसरा मित्र संभाजी फारकटे यानं मदतीचा हात दिला.
शेळीपालन सुरु करण्यापूर्वी या दोन मित्रांनी राज्यातील यशस्वी शेळीफार्मला भेटी दिल्या. शेळीपालनाचं अर्थशास्त्र समजाऊन घेतलं. आणि मार्च 2014 मध्ये बोरवडे इथं भाडेतत्त्वावर जागा घेऊन, शेळीपालनासाठी शेड उभं केलं. सुरुवातील शिरोही जातीच्या 18, उस्मानाबादी जातीच्या 10 आणि आफ्रिकन बोअर जातीच्या 10 अशा 38 शेळ्यांपासून व्यवसाय सुरु झाला.
1 एकरात 70 बाय 100 फुटांचं शेड उभारण्यात आलंय. यामध्ये 20 बाय 30 फुटांचे 8 कप्पे तयार केले. प्रत्येक कप्प्यात 20 शेळ्या राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. इथं शेळ्या, गाभण शेळ्या, नर आणि करडं वेगवेगऴी ठेवली जातात. तर शेळ्याच्या आहाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मका, हत्तीगवत, ल्यूसर्न आणि शाळूपासून हायड्रोपोनिक्स चाऱ्याची निर्मिती केली जाते. हा चारा कुट्टी मशीनमधून बारीक करुन शेळ्यांना दिला जातो.
दररोज पहाटे 6 वाजल्यापासून गोठ्याचं कामकाज सुरु होतं. रोज गोठ्याची स्वच्छता केली जाते. शेळ्यांना मका, गव्हाचा भरडा दिला जातो. दुपारी 12 वाजता प्रत्येक शेळीला 3 किलो हिरवा चारा मिळतो.संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आराम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा चारा दिला जातो. इथं प्रत्येक शेळीला टॅगिंग केलंय. शेळीचं वजन आणि जन्मतारखेच्या नोंदी ठेवल्या जातात. सगळं नियोजनबद्ध.
अडीच वर्षापूर्वी 38 शेळ्यांपासून सुरु केलेल्या या व्यवसायात आज 225 शेळ्या आहेत. यातील 50 शेळ्यांची विक्री झाली. यातून त्यांना 10 लाखांचा नफा झाला.
शेड उभारणी, शेळ्यांची खरेदी आणि पशूखाद्य असा 18 लाखांचा खर्च आतापर्यंत झाला आहे. यंदाच्या वर्षात हा खर्च फेडून 10 लाखांचा निव्वऴ नफा होण्याची आशा आहे.
शिरोही जातीच्या शेळ्यांची वाढ जलद गतीनं होतं असल्यानं, पुढं याच जातीच्या संगोपनाकडं प्रकाश आणि मारुतीचं लक्ष देणार आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासून सुरु झालेली प्रकाश आणि मारुतीची मैत्री व्यवसायात रुपांतरीत झाली. आणि एक यशस्वी वाटचाल सुरु झाली. केवळ विश्वासावर उभारलेला हा शेळीपालन व्यवसाय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
महाराष्ट्र
भारत
Advertisement