भारतातील 15 अधिकारी पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवली; तपासात खळबळजनक खुलासा
सीआरपीएफ जवान मोती राम जाट यांना पाकिस्तानी गुप्तहेरासोबत माहिती शेअर करण्यासाठी नियमितपणे 12. 000 रुपये पाठवले जात होते. असे तपासात दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितलंय.

Indian Army : केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे कि, असे 15 फोन नंबर सापडले आहेत, जे पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात होते. हे नंबर लष्करातील सैनिक, निमलष्करी दलातील जवान आणि सरकारी खात्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांशी संबंधित असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. सीआरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक मोती राम जाट यांच्या तपासात हि माहिती उघड झाली आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सीआरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक मोती राम जाट यांनाही तीन महिन्यांपूर्वी या पाकिस्तानी गुप्तहेरासोबत भारताशी संबंधित माहिती शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तपास यंत्रणांनी हा खुलासा केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) 27 मे रोजी मोती राम जाट यांना अटक केली होती. तर 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवस आधीपर्यंत मोती राम जाट सीआरपीएफ बटालियनमध्ये तैनात होते, परंतु हल्ल्याच्या फक्त पाच दिवस आधी ते दिल्लीत तैनात होते.
15 अधिकारी पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात
तांत्रिक तापसात असे दिसून आले की केवळ मोती राम जाटच नाही तर इतर 15 फोन नंबर देखील पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होते. अधिकारी या नंबरच्या कॉल रेकॉर्ड आणि डेटाची तपासणी करत आहेत. या पाकिस्तानी ऑपरेटिव्हचे कोडनेम सलीम अहमद आहे. सूत्रांनी सांगितले की, या 15 फोन नंबरचे कॉल रेकॉर्ड आणि इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड स्कॅन केले असता असे आढळून आले की, यापैकी 4 नंबर भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांचे, 4 पॅरामिलिटरी फोर्सच्या कर्मचाऱ्यांचे आणि उर्वरित सात नंबर विविध सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांचे होते.
कोलकाता येथून सिम खरेदी
सूत्रांनी सांगितले की, तपासात असेही उघड झाले आहे की, ज्या नंबरद्वारे मोती राम जाट संपर्कात होता तो नंबर कोलकाता येथून खरेदी करण्यात आला होता आणि सिम सक्रिय करण्यासाठीचा ओटीपी देखील लाहोरमध्ये बसलेल्या पाकिस्तानी ऑपरेटिव्हला पाठवण्यात आला होता. कोलकाता येथून हा नंबर खरेदी करणारा व्यक्ती कोलकाता येथील आहे, ज्याने 2007 मध्ये एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले आणि नंतर 2014 मध्ये तिथे स्थलांतरित झाला. तो वर्षातून दोनदा कोलकाता येथे येत असे.
गुप्तचर माहिती पाठवण्याच्या बदल्यात नियमितपणे 12,000 रुपये
सूत्रांनी असेही सांगितले की, मोती राम जाटला माहिती शेअर करण्याच्या बदल्यात भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून अनेक वेळा पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांत, गुप्तचर माहिती पाठवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे 12,000 रुपये देण्यात आले, जे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले गेले. मोती राम जाटचा दावा आहे की, तो प्रथम चंदीगडच्या एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराच्या संपर्कात आला आणि नंतर त्याच्याशी फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलू लागला. या काळात त्याने अनेक कागदपत्रे देखील शेअर केली. तो म्हणाला की नंतर तो एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी बोलू लागला आणि हे सर्व चालू राहिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोती राम जाटने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीशी संबंधित माहिती, अनेक एजन्सींच्या केंद्रांशी संबंधित माहिती, सैनिकांच्या हालचालींशी संबंधित माहिती पाकिस्तानी हँडलरसोबत शेअर केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























