Paatal lok 2 Review : हाथीराम चौधरीला फुल मार्क्स, प्राईम व्हिडीओची वर्षाची धमाकेदार सुरुवात
Patal lok Season 2 Review : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पाताल लोक 2 प्रदर्शित झाला असून ही सीरीज नेमकी कशी आहे, हे जाणून घ्या.
अविनाश अरुण धावरे
जयदिप अहलावत, ईश्वाक सिंह, गुल पनाग, तिलोतमा शोम
Amazon Prime Video
Patal lok 2 Review : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पाताल लोक वेब सीरीजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Amazon Prime Video वर 17 जानेवारीपासून ही वेब सीरीज पाहता येणार आहे. पाताल लोक सीरीजचा पहिला सीझन हिट ठरला होता, तेव्हापासूनच प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती. पाताल लोक सीरीजचा दुसरा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच धमाकेदार आहे. आता पाताल लोक 2 प्रदर्शित झाला असून ही सीरीज नेमकी कशी आहे, हे जाणून घ्या.
पाताल लोक सीझन 2 मध्ये एकूण 8 एपिसोड असून प्रत्येक एपिसोड सुमारे 40 मिनिटांचा आहे. प्राईम व्हिडीओने या सीरीजद्वारे 2025 या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात केली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्राईम व्हिडीओ सीक्वेलच्या बाबतीत कधीही प्रेक्षकांची निराशा करत नाही. या आधीही फॅमिली मॅन (Family Men), पंचायत (Panchayat), सिटाडेल (Citadel), मेड इन हेवन (Made in Heaven) आणि बंदिश बँडिट (Bandish Bandits) या सीरिजचे सीक्वेल हिट ठरले आहेत.
कथा
जयदिप अहलावत (Jaideep Ahlawat) हाथीराम चौधरीच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. हाथीराम चौधरी जमनापार पोलिस ठाण्यात इंस्पेक्टर आहेत, तर ईश्वाक सिंह (Ishwak Singh) म्हणजेच त्यांचा ज्युनियर अंसारी आता ACP बनला आहे. नागालँडमध्ये एका महत्त्वाच्या शिखर परिषदेपूर्वी एक खून होतो, हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. ACP अन्सारी चौकशी करतो आणि हाथीराम चौधरीला सोबत घेऊन जातो, आणि मग काय होते, ते दाखवलं आहे. तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडते, हे कळण्यासाठी तुम्हाला सीरीज पहावी लागेल.
सीरीज कशी आहे?
पाताल लोक सीरिजचा 2020 मध्ये आलेला पहिला सीझन धमाकेदार ठरला होता, आता 2025 मध्ये आलेला दुसरा सीझनही खूपच मनोरंजक आहे. बऱ्याचदा दुसऱ्या सीझनमध्ये काही त्रुटी आढळतात किंवा प्रेक्षकांना काही गोष्टी खटकतात. पण, पाताल लोक 2 पाहताना तुम्हाला असं वाटणार नाही, याची पूर्ण काळजी प्राईम व्हिडीओने घेतली आहे. नागालँडच्या प्रकरणाची संवेदनशीलतेला लक्षात घेऊन, अनावश्यक ड्रामा नाही, मोठ्या आवाजाचे संगीत नाही, अनावश्यक सेक्स सीन नाहीत, असा पाताल लोक 2 आहे. पण, हो यामध्ये शिवीगाळ मात्र आहे, त्याशिवाय पाताल लोकची फिलिंग कशी येईल.
अभिनय
जयदीप अहलावत हा आजच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे, हे त्याने पुन्हा एकदा दमदार अभिनयाने दाखवून दिलं आहे. कधीकधी मला असं वाटतं की, जयदीप अहलावतमध्ये इरफान खानसारखाच करिष्मा आहे, इथे तो 5 वर्षांपूर्वीसारखाच दिसतो, अगदी हाथीराम चौधरीसारखा, शरीरयष्टीने आणि त्याच्या स्टाइलने. तो त्याच्या भाषा आणि संवादांनी मने जिंकतो. तो दबंग सिंघम किंवा सिम्बा नसला, तरी त्यांच्यापेक्षाही अद्भुत आहे. त्याने हरियाणी पात्र चांगलं साकारलं आहे. ईशान सिंहही कौतुकास पात्र आहे, ACP बनल्यानंतरही तो हाथीरामला आदर देतो. गुल पनागचे कामही उत्कृष्ट आहे, तिने या पात्रात जीव ओतला आहे. तिलोतमा शोमने नागालँड पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. नागेश कुकुनूरचं काम अद्भुत आहे, इतर सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे.
दिग्दर्शन
अविनाश अरुण धावरे यांचे दिग्दर्शन कौतुकास्पद आहे, त्यांनी 'पाताल लोक'चा आत्मा जिवंत ठेवला आहे. 5 वर्षात आलेल्या वेगवेगळ्या कंटेंटमुळे त्यांच्यावर परिणाम झाला नाही, शोचे लेखन देखील अद्भुत आहे.
प्राइम व्हिडीयोने 2025 वर्षाची धमाकेदार सुरुवात केली आहे, ही सीरीज नक्की पाहा.
रेटिंग - 4 स्टार