Money Heist Review : भ्रमजाळात स्पेन सरकारला अडकवून प्रोफेसरच विजयी
Money Heist Review: रहस्य, रोमांचने भरलेली आणि क्षणाक्षणाला कथेमध्ये कलाटणी आणणारी 'मनी हाईस्ट'.
Alex Pina
Alvaro Morte, Pedro Alonso, Miguel Herran, Ursula Corbero, Najwa Nimri, Diana Gomez, Fernando Cayo
2017 मध्ये 'मनी हाईस्ट' नावाची एक स्पॅनिश वेबसीरीज आली होती. प्रोफेसर (अल्वारो मोर्ते) आठ-दहा जणांना एकत्र करून मोठमोठ्या चोऱ्या करतो आणि साथीदारांसह पलायन करण्यात यशस्वीही होतो. त्याच्या या कारनाम्यांनी संपूर्ण जगातील प्रेक्षकांना वेड लावले होते. मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनच्या शेवटाची जगभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. शेवटच्या सीजनच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड चाळवली होती. याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात असतानाच हा भाग रिलीज झाला आणि त्यावर प्रेक्षक तुटून पडले. क्षणाक्षणाला नाट्य, सस्पेंस, कथानकाला कलाटण्या यामुळे शेवटचा भाग पाहताना प्रेक्षक रंगून जातो आणि दिग्दर्शक एलेक्स पीनाच्या कौशल्याला सलाम करीत राहातो.
पाचव्या भागात प्रोफेसर स्पेनच्या राष्ट्रीय बँकेवर दरोडा घालतो. पाचव्या सीझनच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या एपिसोडमध्ये महिला इन्स्पेक्टर एलिसिया सिएरा (नजवा निमरी) प्रोफेसरला अटक करताना दाखवली होती. ती गरोदर असते आणि त्याच वेळी ती बाळंतही होते. प्रोफेसर आणि त्याचे मित्र तिला कशी मदत करतात ते शेवटच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते. सीझनचा दुसरा भाग म्हणजेच सहावा एपिसोड तिथूनच सुरु होतो आणि प्रेक्षक रंगून जाऊ लागतो. स्पेन सरकारने बँकेत त्यांचा सोन्याचा साठा ठेवलेला असतो. हे सोने चोरून स्पेन सरकारला धडा शिकवण्याचा प्रोफेसरच विचार असतो. स्पेन सरकारला धडा का शिकवायचा असतो ते या भागात दाखवण्यात आलेले आहे. प्रोफेसर नेहमीप्रमाणेच प्लॅन बीसह या दरोड्याचीही आखणी करतो. सोने चोरले जाते. तो सगळ्यांसमोर कसे पळवले जाते याचे लाईव्ह सादरीकरणही प्रोफेसर करतो. मात्र याच दरम्यान त्याचे सगळे साथीदार पोलीस ताब्यात घेतात. आपल्या साथीदारांना सोडण्यासाठी प्रोफेसरला बँकेत यावे लागते. त्यानंतर असे वाटते की प्रोफेसर हरला. आता त्याला सर्व काही कबूल करावे लागणार. पण तो प्रोफेसर असतो आणि त्याचा प्लॅन अत्यंत परफेक्ट असतो.
त्याच्या या प्लॅनमुळेत संपूण स्पेन सरकार, पोलीस, मिलिट्री एका भ्रमजाळ्यात सापडतात. प्रोफेसरच्या प्लॅनमुळे स्पेन सरकार रसातळाला जाण्याची स्थिती निर्माण होते. एके काळी अत्यंत बलाढ्य अर्थव्यवस्था असलेला स्पेन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा राहातो. यातून मार्ग काढण्यासाठी कर्नल तमायो प्रोफेसरपुढे गुडघे टेकतो. प्रोफसर सगळ्यांच्या सुटकेच्या बदल्यात चोरलेले 100 टन सोने स्पेन सरकारला परत करण्याचे आश्वासन देतो. त्यानुसार सोनेही परत करतो पण ते सोने नसते तर त्या असतात सोन्याचा मुलामा दिलेल्या पितळेच्या विटा.
कर्नल तमायोला प्रोफेसरची ही चाल समजते आणि तो सगळ्यांना ठार करण्याचा विचार करतो. परंतु प्रोफेसर त्याला समजावतो की, तू सोने परत मिळवलेस हे सगळ्यांना समजलेय, देशाची अर्थव्यवस्था मार्गावर आलीय. जर तू आम्हाला मारलेस तर बँकेत परत आलेले सोने नसून पितळेच्या विटा आहेत हे सगळ्यांना समजेल आणि देश रसातळाला जाईल. तुला सोने कधीही मिळणार नाही. पुढील 50 वर्षे हे नकली सोने असेच बँकेत पडून राहिल. कोणाला काही समजणार नाही. या सोन्याला काही किंमत नाही हे फक्त नावाला आहे है वैश्विक सत्य तो कर्नल तमायोला सांगतो. अखेर तमायो झुकतो आणि सगळ्यांना सोडून देतो.
प्रोफेसर आणि त्याच्या गँगने चोरलेले सोने कुठे असते याचा उलगडा शेवटच्या काही मिनिटात होतो. प्रोफसरची गँग आणि त्यांचे आपसातले नाते संबंध हा सुद्धा अनुभवण्याचा भाग आहे. ज्या वेबसीरीजने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले होते त्याचा शेवट अपेक्षेप्रमाणेच अत्यंत चांगला करण्यात आला आहे. रहस्य, रोमांचने भरलेली आणि क्षणाक्षणाला कथेमध्ये कलाटणी आणणारी ही वेबसीरीज नक्कीच पाहा असे सुचवावेसे वाटते.
पहिले भाग पाहिलेले नसतील तरीही काही बिघडणार नाही. पाचवा सीझन बघितल्यावर आरामात पहिले चार सीझन पाहा. तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्कीच मिळेल.