Jawan Review : वेगवेगळ्या चित्रपटांची कॉपी करून ठिगळं जोडलेला 'जवान', वाचा रिव्ह्यू...
Jawan Review : शाहरुखच्या जवानसाठी थोडासा कमल हसनचा हिंदुस्तानी, चियान विक्रमचा कांथास्वामी, थोडासा गजनी, थोडा सा चक दे, थोडा सा गब्बर इज बॅक घेऊन जवानची बदल्याची कथा रचण्यात आलीय.
Atlee Kumar
SHAH RUKH KHAN, vijay sethupathi, Priyamani, Nayanthara
Shah Rukh Khan Jawan Review : खाण्यासाठी एखादी चटपटीत डिश बनवायची असेल तर त्यात मीठ, तिखट, अन्य मसाले टाकले जातात. त्यानंतर ती डिश चवीला स्वादिष्ट लागेल, चीभेचे चोचले पूर्ण होतील, पण चांगले काही तरी खाल्ल्याचे पोटाला समाधान होत नाही. अगदी तसाच काहीसा प्रकार शाहरुख खानचा नवा चित्रपट जवानबाबत (Jawan) झालाय. त्यात सगळं काही आहे. शाहरुख खानची (Shah Rukh Khan) दुहेरी भूमिका आहे, साऊथ स्टाईल अॅक्शनचा तडका आहे, देशप्रेम आहे, बाप-मुलाचं नातं आहे. समाजातील वाईट गोष्टींवर आसूड आहे पण ते चवी-चवीपुरतं. त्यातही यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्ये पाहिलेली असल्यामुळे त्यात नाविन्यही जाणवत नाही.
चित्रपट पाहाताना एक जाणवतं की, दक्षिणेचा प्रख्यात दिग्दर्शक अॅटलीने शाहरुख खानला एक चांगली कथा ऐकवली असणार आणि त्याचे प्रेजेंटेशनही चांगल्या प्रकारे केले असेल, मात्र शाहरुख खानने त्यात हस्तक्षेप केला असल्याची शक्यता चित्रपट पाहाताना जाणवते आणि त्यामुळेच चित्रपट प्रभाव पाडत नाही. बदला हा हिंदी अॅक्शन चित्रपटांचा महत्वाचा गाभा असतो. वेगवेगळ्या कारणांसाठी नायक खलनायकाला मारून बदला पूर्ण करत असतो. शाहरुखच्या जवानसाठी थोडासा कमल हसनचा हिंदुस्तानी, चियान विक्रमचा कांथास्वामी, थोडासा गजनी, थोडा सा चक दे, थोडा सा गब्बर इज बॅक घेऊन जवानची बदल्याची कथा रचण्यात आलीय.
विक्रम राठोड (शाहरुख खान) भारतीय सैन्यदलात असतो. एका मोहिमेप्रसंगी जवानांची शस्त्रे चालत नाहीत. शस्त्र पुरवठादार कालीच्या (विजय सेतुपती) विरोधात विक्रम राठोड उभा राहतो. त्यामुळे नाराज झालेला काली विक्रम राठोडला मारतो, त्याच्या पत्नीला ऐश्वर्याला (दीपिका पदुकोण)ला तुरुंगात धाडतो. मुलाला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्याला फाशी होते. त्या मुलाला आझादला (शाहरुख खान) एक महिला अधिकारी शिकवते. आझाद त्याच तुरुंगात जेलर म्हणून काम करू लागतो. तुरुंगातील काही महिला कैद्यांच्या मदतीने आझाद रुप बदलून शेतकरी आत्महत्या, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवतो आणि त्या सुधारण्यास सरकारला बाध्य करतो. स्पेशल टास्क फोर्सची अधिकारी नर्मदा (नयनतारा) सरकारला ब्लॅकमेल करणाऱ्या या टीमच्या मागे लागलेली असते.
आझादचाही कालीशी सामना होतो. आझाद अडचणीत असतानाच विक्रम राठोड पुन्हा येतो. त्यानंतर आझाद आणि विक्रम राठोड कालीच्या विरोधात लढाई सुरु करतात. स्मृतीभ्रंश झालेल्या विक्रम राठोडला योग्य वेळी सर्व काही आठवते. दुहेरी भूमिका साकारणे शाहरुखला खूप आवडते. त्यामुळे यातही त्याने बाप आणि मुलाची भूमिका नेहमीप्रमाणेच साकारली आहे. बापाच्या भूमिकेसाठी त्याने भारदस्त आवाज काढलाय जो अग्निपथमधल्या अमिताभ बच्चनच्या आवाजाची आठवण करून देतो. त्याचा उत्साह पडद्यावर जाणवतो. चित्रपटाच्या शेवटी राजकीय भाष्य करीत देशातील मतदारांना मतदानाचा अधिकार योग्यरित्या बजावण्याचा संदेशही शाहरुखने देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ज्यांना दाक्षिणात्य चित्रपटांची माहिती नाही त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट असेल. कारण बहुतेक दाक्षिणात्य चित्रपटात राजकीय भाष्य अत्यंत टोकदारपणे केलेलेच असते. मतदानाच्या अधिकारापासून ते राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यापर्यंत, भ्रष्टाचार आणि प्रदूषणापर्यंत दाक्षिणात्या चित्रपटात भाष्य असते. हिंदी चित्रपट यशराज आणि धर्मा प्रोडक्शनमुळे फक्त रोमँटिझमच्या विळख्यात अडकला आहे. शाहरुखने जवानच्या निमित्ताने काहीतरी वेगळे केले एवढेच उल्लेखनीय आहे.
नयनताराची नर्मदाची भूमिका प्रभावहीन आहे. विजय सेतुपतीने कालीची खलनायकी बाजाची भूमिका बऱ्यापैकी साकारली आहे. केवळ तामिळ आणि तेलुगुमध्ये चित्रपट रिलीज होणार असल्याने नयनतारा आणि विजय सेतुपती यांना भूमिका देण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवते. अर्थात दिग्दर्शक अॅटलीही दक्षिणेचाच असल्याने चित्रपट थेट दाक्षिणात्य पद्धतीचाच वाटतो. अॅटलीच्या दिग्दर्शनाची विशेष तारीफ करावी असे काही नाही. त्याचा दिग्दर्शकीय करिश्मा दिसेल असे एकही दृध्य नाही. संजय दत्त आणि दीपिका पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाता संगीत दाक्षिणात्य संगीतकार अनिरुद्धने दिले आहे. एक-दोन गाणी वगळली तर त्यात काही विशेष नाही. शाहरुखचे फॅन्स त्याचा हा चित्रपट पाहतीलच.