Dharmaveer Review : धगधगती 'आनंद'गाथा!
Dharmaveer Review : पक्षीय प्रचार, प्रसाराच्या पलिकडे जाऊन एक गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडणारा सिनेमा म्हणजे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’.
Pravin Tarde
Prasad Oak, Kshitish Date Makarand Padhye
Dharmaveer Review : खरं तर सध्या आपला पॉलिटिकल अजेंडा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांवर थोपवण्याचा एक ट्रेंड आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या ट्रेंडचा वाटेकरी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या सगळ्यात ‘धर्मवीर’ खूप वेगळा ठरतो. कारण पक्षीय प्रचार, प्रसाराच्या पलिकडे जाऊन एक गोष्ट आपल्यासमोर तो मांडतो आणि तिकिट काढल्यानंतर सिनेमा म्हणून आपल्याला ज्या ज्या अपेक्षा असतात त्या त्या तो पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.
याचं सगळ्यात मोठं श्रेय मी प्रसाद ओकला देईन. कारण ज्यापद्धतीने त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे ती कमाल आहे. प्रसादला आजवर आपण अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आहे. मात्र हे त्याचं बहुदा पहिलं काम असेल जिथं तो प्रसाद म्हणून अजिबात दिसत नाही. आपण त्याच्याकडे फक्त आणि फक्त आनंद दिघे म्हणूनच पाहतो. त्यामागे विद्याधर भट्टेंच्या मेकअपची कमाल असली तरी प्रसादने घेतलेली मेहनत शतपटीने दिसते. लूक वगैरे गोष्टी सुरुवातीची काही मिनिटं प्रभाव टाकतात. त्यानंतर बोलतो तो फक्त तुमचा परफॉर्मन्स. आणि हाच परफॉर्मन्स प्रसाद ओकने दाखवला आहे.
खरं तर या विषयाचा अवाका फार मोठा आहे. त्याला 2-3 तासांच्या अवकाशात पकडणं कठीण काम. प्रवीण तरडेने पटकथाच अशा पद्धतीनं गुंफली की हे आव्हान अगदी सोपं व्हावं. म्हणजे प्रवीणचा मुळशी पॅटर्न आपल्याला माहित आहेच. तोच पॅटर्न त्याने इथंही वापरला आहे. सुरुवात वर्तमानात करायची आणि त्या प्रवासात भेटणाऱ्या मंडळींची एक एक गोष्ट भूतकाळात नेऊन सांगायची असा हा पॅटर्न. तोच पॅटर्न धर्मवीरच्या बाबतीत कमालीचा यशस्वी ठरलाय.
अभिनयाच्या बाबतीत छोट्या छोट्या भूमिकेत दिसणाऱ्या प्रत्येकाने अक्षरश: जीव ओतून काम केलंय. विजय निकम, स्नेहल तरडे, विघ्नेश जोशी, अभिजीत खांडकेकर, मकरंद पाध्ये, शुभांगी लाटकर, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी आणि अर्थात एकनाथ शिंदेच्या भूमिकेत दिसणारा क्षितीश दाते. हे सारेच सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेतात.
छायाचित्रण, संकलन, संगीत या आघाड्यांवरही ‘धर्मवीर’ उजवा ठरतो. या सगळ्या सकारात्मक बाबींमध्ये काही खटकणाऱ्या गोष्टीही आहेतच. सगळ्यात जास्त खटकतात ते यात खूप ठिकाणी मुद्दाम पेरलेले टाळ्यांसाठीचे डायलॉग. प्रेक्षकांपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी या संवादांची योजना केली असावी असं वाटतं. आणि ज्या ज्या प्रसंगात, ज्या ज्या दृश्यांमध्ये असे संवाद येतात तेव्हा त्यातली सहजता हरवते. कलाकारही अवघडल्यासारखे वाटतात आणि काही क्षण आपण गोष्टीपासून दूर जातो. ही गोष्ट टाळली असती तर सिनेमाची उंची आणखी वाढली असती.
अगदी याच सिनेमाचं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर सुरुवातीलाच एक सीन आहे, ज्यात दिघेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी हजारोंची गर्दी जमलीय. ही गर्दी सर्वसामान्य माणसांची आहे. आणि त्याच गर्दीत आपल्या सिनेमातली काही पात्रंही आहेत. कॅमेरा जेव्हा हे सारे चेहरे टिपत असतो तेव्हा खऱ्यांच्या गर्दीत मेकअप केलेले चेहरे पटकन ओळखून येतात आणि तेच खटकतं. सिनेमाच्या एकंदर प्रवासातही असंच होतं. खरी गोष्ट मांडता मांडता जिथं जिथं सिनेमा ‘राजकारणा’कडे झुकतो तिथं तिथं तो लक्षात येतो. आणि हेच टाळणं गरजेचं होतं.
या काही गोष्टी सोडल्यास धर्मवीर एक सिनेमा म्हणून आपल्याला उत्तम अनुभव देतो. यात ड्रामा आहे, अॅक्शन आहे, इमोशन आहे थोडक्यात ‘धर्मवीर’ हा पैसा वसूल ‘सिनेमा’ आहे.
सिनेमा संपल्यावर जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्हाला ना शिवसेना आठवते, ना राजकारण, ना कुठला पक्ष आठवतो. उरतो तो फक्त आणि फक्त धर्मवीर आनंद दिघे नावाचा करिश्मा… जो दीर्घकाळ तुमची सोबत करेल यात शंका नाही.