Afwaah Movie Review : आयुष्याची उलथापालथ करणारी 'अफवा'
Afwaah : अफवा पसरवण्याची एक चूक किती महागात पडते हे 'अफवाह' या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
सुधीर मिश्रा
नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमि पेडनेकर, सुमित व्यास
Afwaah : एखाद्या गोष्टीची अफवा ही वणव्यासारखी पसरते, असं म्हटलं जातं. जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानाचा अवलंब करत वेगाने अफवा पसरवली जात आहे. तुम्हीदेखील सोशल मीडियावर काहीही विचार न करता एखादा व्हिडीओ फॉरवर्ड किंवा शेअर करत असाल तर 'अफवाह' (Afwaah) हा सिनेमा नक्की पाहा... अफवा पसरवण्याची एक चूक किती महागात पडते हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
'अफवाह' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Afwaah Movie Story)
'अफवाह' या सिनेमात अफवा ही गोष्ट केंद्रबिंदू आहे. नवाज (Nawazuddin Siddiqui) आणि भूमिबद्दल (Bhumi Pednekar) अफवा पसरवली जाते. नवाज हा परदेशातून भारतात आलेला आहे आणि मायदेशात येऊन काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे. तर भूमीचे वडील हे राजकारणी असून ते त्यांच्या लाडक्या लेकीसाठी स्थळ शोधत आहेत. युवा नेते सुमित व्याससोबत ते त्यांच्या लेकीचं लग्न ठरवतात. पण भूमीला मात्र सुमितसोबत लग्न करायचं नसल्याने ती घरातून पळून जाते.
भूमीच्या घरचे मंडळी आणि होणारा पती तिचा शोध घेतात. दरम्यान भूमी नवाजला भेटते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते. त्यानंतर नवाज तिला त्या लग्नापासून आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यापासून वाचवतो. त्यानंतर भूमीचा होणारा नवरा अफवा पसरवतो की, नवाजनेच भूमीला पळवलं. भूमी ही हिंदू असून नवाज हा मुस्लिम दाखवण्यात आला आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या प्रकरणाचा सिनेमात ट्वीस्ट येतो. आता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.
तगडी स्टारकास्ट असलेला 'अफवाह'
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दर्जेदार अभिनयाची झलक 'अफवाह'मध्येदेखील पाहायला मिळाली आहे. भूमी पेडणेकरनेदेखील आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क केलं आहे. सुमित व्यासची राजकारणी नेत्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. शारिब हाशमीचंदेखील काम चांगलं झालं आहे. एकंदरीतच तगडी स्टारकास्ट असलेल्या 'अफवाह' सिनेमातील सर्वच कलाकारांनी 100% दिले आहेत.
'अफवाह' हा सिनेमा सुरुवातील थोडा रटाळ वाटतो. पण काही मिनिटांतच सिनेमाच्या कथानकाला गती मिळते. त्यामुळे सुरुवातील संथ वाटणारा सिनेमा हळूहळू प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतो. मनोरंजनासोबत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे. एक अफवा पसरवण्याची चूक किती महागात पडते हे या सिनेमात योग्यपद्धतीने दाखवण्यात आलं आहे.
'अफवाह' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुधीर मिश्रा यांनी सांभाळली आहे. आजवर त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. 'अफवाह' या सिनेमातदेखील त्यांच्या दिग्दर्शनाची एक वेगळा बाजू पाहायला मिळत आहे. फेक न्यूज आणि अफवा फसरवण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत खूप वाढलं आहे. त्यामुळे आजच्या काळात या सिनेमाचं खूप महत्त्व आहे.