वेळ, भविष्य अन् मृत्यूची टांगती तलवार; कसा आहे आयफोनवर शूट झालेला 'फुरसत'? वाचा रिव्ह्यू
फुरसत (Fursat) हा चित्रपट 'आयफॉन- 14' प्रोमध्ये शूट करण्यात आला आहे.
Vishal Bhardwaj
Ishaan Khatter, Wamiqa Gabbi
Fursat Short Film: कॉर्डलेस फोन आकाराचा मोबाईल ते टच स्क्रिन फोन हा टेक्नोलॉजीचा प्रवास अनेकांनी पाहिला असेल. वेगवेगळ्या कंपनीच्या फोनचा वापर करणे, हा प्रतिष्ठेचा विषय होत आहे, असं म्हणता येईल. सध्या आयफॉनची क्रेझ पहायला मिळत आहे. या फोनचे फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटीची चर्चा तरुणी पिढी अवडीनं करत असते. काही फिल्मेकर चित्रपटाच्या शूटिंगसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करत असतात, पण आता एका फिल्ममेकर चक्क आयफॉनमध्येच एका शॉर्ट फिल्मचं शूटिंग केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची 'फुरसत' ही शॉर्ट फिल्म 'आयफॉन- 14' प्रोमध्ये शूट करण्यात आला आहे. या फिल्मच्या कथेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'फुरसत' या शॉर्ट फिल्ममध्ये निशांत नावाच्या एक तरुणाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. निशांतला दूरदर्शक या त्याच्याकडे असणाऱ्या एका यंत्रामधून भविष्य दिसत असते. या दूरदर्शकाच्या माध्यमातून तो आपल्या प्रेयसीचे भविष्य बघत असतो. दूरदर्शकामध्ये निशांतनं त्याच्या प्रेयसीचा एक केस ठेवलेला असतो. ज्यामुळे त्या दूरदर्शकामधून निशांतला तिचे भविष्य दिसत असते. फुरसत लघुपटाच्या सुरुवातीला निशांतला दूरदर्शकामधून त्याच्या प्रेयसीचा खून होणार आहे, हे दिसते.
निशांतकडे फार कमी वेळ असतो. त्याला त्याच्या प्रेयसीचा जीव वाचवायचा असतो. त्यामुळे तो धावू लागतो. एका रेल्वेमध्ये निशांतच्या प्रेयसीचा साखपुडा होत असतो. त्या रेल्वेपर्यंत निशांत पोहोचतो. निशांत रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्याच्या प्रेयसीला भेटतो. निशांत दूरदर्शकामधून त्यानं पाहिलेल्या भविष्याबद्दल सांगतो. त्याची प्रेयसी या सर्वगोष्टींवर विश्वास ठेवत नसते. कारण या आधी देखील त्याच दूरदर्शकामुळे निशांत आणि तिचं लग्न मोडलेलं असतं. आता निशांत हा तिच्या प्रेयसीचा जीव वाचवू शकतो का? निशांतला दूरदर्शकामधून दिसलेलं भविष्य खरं ठरतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला फुरसत ही शॉर्ट फिल्म बघावी लागेल. युट्यूब आणि हॉटस्टार या अॅपवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
फुरसत या शॉर्ट फिल्ममध्ये फ्रेम्स, कॅमेरा अँगल्स या खास आहेत. ही शॉर्टफिल्म एका मोबाईलवर शूट केला आहे, असं वाटत नाही. विविधरंगी घरं असो वा वाळवंट, फुसरतमधील प्रत्येक फ्रेम खूप क्रिएटव्ह वाटते. ही म्युझिकल शॉर्ट फिल्म आहे. यामधील गाणी देखील तुम्हाला आवडतील. अभिनेता ईशान खट्टरनं (Ishaan Khatter) निशांत ही भूमिका साकारली आहे. तर निशांतच्या प्रेयसीची भूमिका अभिनेत्री वामिका गब्बीनं (Wamiqa Gabbi) साकारली आहे. दोघांनी देखील या शॉर्ट फिल्ममध्ये खूप चांगलं काम केलं आहे. फुरसत हा लघुपट खरंच 'फुरसत' मध्ये असतानाच पहावा, असं मला वाटतं.