World Milk Day | जागतिक दूध दिन का साजरा केला जातो? या दिवसाचं महत्त्वं काय?
दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते. जगभरात 1 जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो.
मुंबई : आज जागतिक दूध दिवस आहे. 1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. सर्वात पहिला दूध दिवस 1 जून 2001 रोजी साजरा करण्यात आला होता.
जागतिक दूध दिवस काय साजरा केला जातो? जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगात दूध दिवस साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये 1 जून रोजीच दुग्ध दिवस साजरा केला जात असे. त्यामुळे 2001 सालापासून 1 जून या तारखेलाच दूध दिन साजरा करण्यात येऊ लागला.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेमध्ये जागरुकता पसरवणं आणि वाढवणं असा आहे. तसंच लोकांना दुधाच्या बाबतीत अधिक ज्ञान मिळू शकेल, जेणेकरुन दुधाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व लोकांना पटेल.
जागतिक दूध दिवसाद्वारे लोकांना दुधाचं उत्पादन, दुधाच्या पौष्टिकतेचं महत्त्व आणि दुधाच्या विविध उत्पादनांसह याचं आर्थिक महत्त्व समजावलं जातं.
दुधाचं महत्त्व आणि फायदे दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते. दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषणतत्त्वांचा अतिशय चांगला स्त्रोत आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, ऑयोडिन, आयरन, पोटॅशियम, फोलेट्स, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड, रायबोफ्लेविन, जीवनसत्व ब12, प्रोटीन, उत्तम फॅट इत्यादीचा समावेश असतो. दूध प्यायल्यामुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते, कारण यात उच्च प्रतीच्या प्रथिनांसह अमिनो अॅसिड आणि फॅटी अॅसिडचा समावेश असतो.
आज जगभरात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत आहे. भारताने दूध उत्पादनातून जागतिक स्तरावर वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. दरम्यान मिल्क मॅन अशी ओळख असलेले वर्गिस कुरियन हे भारतातील धवल क्रांतीचे जनक आहेत. कुरियन यांनी 'अमूल'च्या माध्यमातून देशात दुग्ध क्रांती घडवली होती.