World Cancer Day 2023 : महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये, स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सरचे प्रकार कोणते?
World Cancer Day : भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. यात महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने दिसून येतात.
World Cancer Day : कर्करोग (Cancer) हा जीवघेणा आजार आहे हे आपल्याला माहिती आहे. अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्येच कॅन्सरचं निदान झालं नाही, तर रुग्णाचा जीव वाचवणं अवघड असतं. परंतु, अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कॅन्सरच्या लक्षणांकडे (Cancer Symptoms) दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यामुळे कॅन्सर बळावण्याची शक्यता अधिक असते. मात्र बऱ्याच महिलांना कॅन्सरबद्दल माहितीचं नसते. भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. यात महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये (Cancer In Women) स्तनांचा कॅन्सर, सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने दिसून येतात. या व्यतिरिक्त ब्लॅडर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, कोलन आणि रेक्टल कॅन्सर, किडनी कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅनेक्रॅटिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, थॉयरायईड कॅन्सर, मेलेनोमा, ब्रेन कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, स्किन कॅन्सर हे अन्य काही प्रकार आहेत.
स्तनाचा कर्करोग - स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यूही होऊ शकतो. स्तनाचा कर्करोग म्हणजे एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये घातक कर्करोगाच्या पेशींची वाढ. ते अत्यंत घातक आहे. स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. बहुतेक स्तनाचा कर्करोग नलिकांना अस्तर असलेल्या पेशींमध्ये किंवा स्तनाच्या ग्रंथीच्या ऊतींच्या लोब्यूल्समध्ये विकसित होतो. स्तनाच्या कर्करोगाचे चार टप्पे असतात. जर त्याची लक्षणे पहिल्या टप्प्यात आढळली तर पूर्ण बरे होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. स्टेज 3 आणि 4 खूप धोकादायक आणि घातक असल्याचे सिद्ध होते. ग्लोबोकन 2018 च्या अहवालानुसार स्तनाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असून जगभरात 2.1 दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात, स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगाचा प्रकार आहे, ज्यामध्ये दर 1 लाख महिलांपैकी 12.7 टक्के महिलांचा मृत्यु होतो आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्तनाची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. स्तनाचा आकार बदलल्यास, स्तनात वेदना किंवा द्रव स्त्राव होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
गर्भाशय मुखाचा कर्करोग - ह्यूमन पेपिलोमा या विषाणूच्या संक्रमणाने हा कर्करोग होतो. कमी वयात तसेच जास्त पुरूषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांना हा कर्करोग होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे 40 ते 50 वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण दिसून येते. लैंगिक संबधांदरम्यान तीव्र वेदना, स्त्रियांच्या गुप्तांगामधून दुर्गंध येणं, लैंगिक संबंधांनतर गुप्तांगांमधून रक्तस्राव, पीरियड्समध्ये अनियमितता आणि अचानक रक्तस्राव होणं, शौचाला होताना रक्तस्त्राव होणं, जास्त थकवा, वजन कमी होणं, अन्नाची वासना न होणं, पोटात दुखणं आणि लघवी होताना वेदना होणं, ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या काळात करणे कठीण असते. सुरुवातीच्या काळात उपचार झाल्यास रूग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाशी पेशी जास्त वाढल्यामुळे होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोहोचतात. या कर्करोगाची सुरुवातीला काहीच लक्षणे दिसून येत नाही. या आजाराचे निदान कऱण्यासाठी पॅप स्मिअर ही चाचणी करण्यात येते. या चाचणीद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा पुढील दहा वर्षे होणार की नाही याविषयी माहिती मिळते.
अंडाशयाचा कर्करोग - अंडाशयाचा कर्करोग हा बहुतांशवेळा चाळिशीनंतर वा रजोनिवृत्तीनंतर होतो. सुरुवातीची लक्षणं ही इतर सर्वसामान्य लक्षणांसारखीच असतात. पोट फुगल्यासारखं वाटणं, धाप लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं, ॲसिडिटीचा त्रास, मासिक पाळीत अनियमितता इत्यादी अस्पष्ट लक्षणांमुळे प्राथमिक टप्प्यात दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. ओटीपोटात दुखणं, रजोनिवृत्तीनंतरही मासिक पाळीसारखा रक्तस्राव होणं, पोट दुखणं, जलोदर, पाठ व कंबर दुखणं, भूक न लागणं, वजन कमी होणं आणि पायावर सूज येणं इत्यादी लक्षणं नंतरच्या टप्प्यात आढळतात.
वल्वर (योनीमार्गातील) कर्करोग - महिलांच्या गुप्तांगाच्या बाहेरील भागात वल्वर कर्करोग होतो. याला वल्वर कॅन्सर म्हणतात. हे प्रामुख्याने मूत्रमार्ग आणि योनीच्या पृष्ठभागावर स्थित आहे. त्याला वेस्टिब्यूल देखील म्हणतात. त्यामध्ये योनीवर खाज सुटलेल्या गाठी किंवा फोड असतात, जे कर्करोगाचे असू शकतात. जेव्हा पेशी त्याच्या डीएनएमध्ये उत्परिवर्तन करते तेव्हा कर्करोग सुरु होतो. डीएनएमध्ये सूचना असतात ज्या सेलला काय करावे हे सांगतात. जेव्हा इतर सामान्य पेशी मरतात तेव्हा नवीन पेशी तयार होतात. अकार्यक्षम पेशी नष्ट न झाल्यास, या पेशी एकत्र होऊन एक गाठ तयार होते जी कर्करोग होऊ शकते. जो शरीराच्या इतर भागातही पसरु शकतो. योनीच्या कॅन्सरची अशी लक्षणे असतात जी सामान्यपणे कुणाशी सहज शेअर करता येत नाहीत. या प्रमुख कारणामुळे योनीचा मार्गाचा कॅन्सर उशिरा कळतो. तसेच वल्वर कॅन्सरची लक्षणे ही इतर आरोग्याच्या बिघाडासारखाचे असतात. ज्यामुळे अनेकदा याबाबत दुर्लक्ष केलं जातं. जसे की, खाजगी भागात वेदना होणं, मासिक पाळीशी संबंधित रक्तस्त्राव, वल्वरच्या त्वचेत बदल आणि रंग बदलणं ही या कॅन्सरची लक्षणं आहेत.
युरिनरी कॅन्सर - वारंवार लघवीला होणे, लघवीला साफ न होणे किंवा मूत्राशयाच्या कार्यात बिघाड निर्माण होणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये युरिनरी इन्फेक्शनमुळे देखील हा त्रास वारंवार जाणवतो.
तोंडाचा कर्करोग - तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडातील ऊतींची असामान्य वाढ जी कर्करोगात बदलते. हे तोंडापासून नाक, मानेच्या भागात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकते. सुरुवातीला, तोंडात पांढरे किंवा लाल ठिपके पडणे, जीभ, ओठ किंवा तोंडावर फोड येणे, तोंडातून रक्त येणे, तोंडाच्या भागात सूज येणे आणि गिळण्यास त्रास होणे ही लक्षणे असू शकतात. ही भारतातील आरोग्याची एक महत्त्वाची समस्या आहे कारण मोठ्या लोकसंख्येला प्रभावित करणारा हा कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. तोंडाचा कर्करोग होण्यासाठी तंबाखूचे सेवन हा प्रमुख घटक आहे. गुटखा, जर्दा, मावा, खर्रा, खैनी, सिगारेट, बिडी आणि हुक्का यासारख्या विविध प्रकारातील तंबाखूचा वापर हे ट्यूमर होण्याचे प्रमुख कारण आहे.
फुफ्फुसांचा कॅन्सर - या कॅन्सरचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. यात नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सरचा समावेश होतो. सामान्यतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना या कर्करोगाचा धोका अधिक असतो. परंतु, व्यसन नसलेल्या व्यक्तींनाही हा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. रेश्मा पालेप, स्तन कर्करोग सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )