Water Toxicity : 20 मिनिटांत 2 लिटर पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू, जाणून घ्या 'वॉटर टॉक्सिसिटी' या आजाराबद्दल बरंच काही...
Water Toxicity : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडियानामध्ये दोन मुलांची आई जास्त पाणी प्यायल्याने मरण पावली. या महिलेने 20 मिनिटांत सुमारे 2 लीटर पाण्याचं सेवन केलं.
Water Toxicity : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेसे पाणी पिणे फार गरजेचे आहे. पण हे पाणी कमी असलं तरी आरोग्यासाठी घातक आहे आणि जास्त पाण्याचं सेवन देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र, काही लोकांना असे वाटते की पाणी आरोग्यास नुकसन पोहोचवू शकत नाही. खरंतर, शरीराला जेवढे पाणी गरजेचं आहे तेवढंच पाणी प्यावे. कारण जास्त पाणी प्यायल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात आणि अचानक मृत्यूचा धोकाही निर्माण होऊ शकतो.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमेरिकेतील इंडियाना येथून एक विचित्र घटना समोर आले आहे. या ठिकाणी एका 35 वर्षीय महिलेचा अल्पावधीतच जास्त पाणी प्यायल्याने मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव अॅशले समर्स असून वीकेंड ट्रिप दरम्यान तिचा मृत्यू झाला. अॅशले पती आणि तिच्या दोन मुलींबरोबर या सहलीला आली होती.
अॅश्लेला पाण्याची खूप आवड होती आणि इंडियाना ट्रिप दरम्यानही तिने बरीच बोटिंग केली होती. ट्रिपच्या शेवटच्या दिवशी, अॅश्लेला डिहायड्रेशनचा खूप त्रास होऊ लागला, त्यामुळे तिला सतत डोकेदुखीचा त्रास होत होता. तिचे शरीर हायड्रेट करण्यासाठी, अॅश्लेने 20 मिनिटांत चार बाटल्या (सुमारे 2 लिटर) पाण्याचे सेवन केले. साधारणपणे एखाद्या व्यक्तीला इतके पाणी प्यायला संपूर्ण दिवस लागतो, परंतु अॅशलेने ते फक्त 20 मिनिटांत केले. तिला चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. ट्रिपवरून परतल्यानंतर अॅशलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पाण्यातील विषबाधामुळे अॅश्लेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पाण्याची विषबाधा म्हणजे काय?
पाण्याची विषबाधा ही समस्या कमी कालावधीत जास्त पाणी प्यायल्यास उद्भवते. या स्थितीत किडनीचा त्रास वाढतो. ओव्हरहायड्रेशनमुळे, रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर वाईट परिणाम होतो आणि सोडियमची पातळी अचानक कमी होऊ शकते. सोडियमच्या कमतरतेला हायपोनेट्रेमिया म्हणतात. सोडियमच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येऊ शकते. यामुळेच जास्त पाणी प्यायल्याने पाणी विषारी होते.
पाण्याच्या विषबाधेची लक्षणं कोणती?
पाण्याच्या विषबाधेमुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, थकवा, उच्च रक्तदाब किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पाण्याच्या विषबाधेच्या गंभीर प्रकरणांमध्ये मध्यवर्ती मज्जासंस्थेचा बिघाड, कोमा यांसारखी लक्षणे दिसतात. कधी-कधी हा त्रास इतका वाढतो की यामुळे मृत्यूही होऊ शकतो.
पाण्याची विषबाधा कशी टाळायची?
एखाद्या व्यक्तीने दररोज 13 कपपेक्षा जास्त पाणी पिणे टाळावे. जर आपण प्रति तासाबद्दल बोललो तर, आपण प्रति तास एक लिटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी प्यायलो तरीही, आपण अतिहायड्रेशनपासून वाचू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :