(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : भारतातील 'या' मंदिरात शिव-पार्वतीचा विवाह होत नाही? महिलांचे वस्त्र घालून पुजारी करतात पूजा, जाणून घ्या
Travel : भारतातील हे एक प्राचीन मंदिर आहे, ज्याला एक आध्यात्मिक महत्त्व आहे. या मंदिराशी संबंधित अनेक तथ्य आहेत, जे लोकांना आकर्षित करतात.
Travel : भारतात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत, ज्यामुळे भले-भले आश्चर्यचकित होतात. आता तुम्हीच पाहा ना.. भारतात असे एक मंदिर आहे. ज्याचे स्वतःचे एक आध्यात्मिक महत्त्व आहे. या मंदिराशी संबंधित अनेक तथ्य आहेत, जे लोकांना आकर्षित करतात. असं म्हणतात, या मंदिरात भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह केला जात नाही, तसेच इथले पुजारी महिलाचे वस्त्र घालून देवाची पूजा करतात, काय आहे यामागील पौराणिक कारण? जाणून घ्या
तुम्ही जर शिवभक्त असाल, तर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायला नक्कीच आवडेल!
भारतातील तामिळनाडू ही देवांची भूमी समजली जाते, तामिळनाडू हे असे राज्य आहे जिथे अनेक मंदिरे आहेत, ज्यांचे स्वतःचे आध्यात्मिक महत्त्व आहे. इथली मंदिरं तुम्हाला आश्चर्यचकित करतील. यापैकी तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिराची स्वतःची ओळख आहे. 7व्या शतकात बांधलेले हे प्राचीन हिंदू मंदिर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात भव्य शिवमंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि तामिळनाडूमधील प्रसिद्ध 5 शिव मंदिरांपैकी एक आहे. असे मानले जाते की हे मंदिर हिंदू चोल वंशाचा राजा कोकेनगानन याने बांधले होते. या मंदिराची स्थापना नक्कीच खूप चित्तथरारक आहे. तुम्ही जर शिवभक्त असाल तर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायला नक्कीच आवडेल. मात्र, या मंदिराशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जाणून घेतल्यावर या मंदिरात जाण्याची तुमची आवड अनेक पटींनी वाढेल.
या मंदिरात शिव-पार्वती विवाह होत नाही? यामागील आख्यायिका काय?
देशातील विविध मंदिरांमध्ये शिव-पार्वती विवाहाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, मात्र या मंदिरात भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह जंबुकेश्वर मंदिरात आयोजित केला जात नाही. यामागे मंदिराशी संबंधित आख्यायिका आहे. असे मानले जाते की, एकदा भगवान शंकराने देवी पार्वतीला पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. यावेळी देवी पार्वती अकिलंडेश्वरीच्या रूपात पृथ्वीवर आली आणि त्यांनी जंबूच्या जंगलात शंकराची पूजा केली. नंतर त्यांनी भगवान शिवाचे दर्शन घेऊन माता पार्वतीची तपश्चर्या पूर्ण केली. येथे माता पार्वती शिष्याच्या रूपात आणि भगवान शिव गुरूच्या रूपात असल्याने त्यांचा विवाह होत नाही. मंदिरातील मूर्तीही एकमेकांसमोर बसवल्या जातात.
शिवलिंगाला अप्पू लिंगम का म्हटले जाते?
या मंदिरात देवी पार्वतीची अकिलंडेश्वरी म्हणून तर भगवान शंकराची जंबुकेश्वर म्हणून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वती जेव्हा पृथ्वीवर आली तेव्हा तिने कावेरी नदीच्या पाण्यातून लिंगाची निर्मिती केली. म्हणून मंदिरात बसवलेल्या शिवलिंगाला अप्पू लिंगम म्हटले जाते. देवीने जांबूच्या झाडाखाली लिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे येथे जंबुकेश्वर म्हणून शंकराची पूजा केली जाते.
पुजारी स्त्रियांचे कपडे घालतात
या मंदिराशी संबंधित एक रंजक समज अशी आहे की येथील पुजारी जंबुकेश्वराची पूजा करताना महिलांसारखे कपडे परिधान करतात. असे करण्यामागचे कारण खूप खास आहे. या मंदिरात देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी तपश्चर्या केली होती, त्यामुळे आजही पुजाऱ्यांकडून महिलांचे कपडे घालण्याची परंपरा आहे.
मंदिराचे स्वतःचे एक ऐतिहासिक महत्त्व!
ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही हे मंदिर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. थेवरम आणि तिरुवसगम यांसारख्या प्राचीन तमिळ ग्रंथांमध्येही या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर अनेक शतकांपूर्वी बांधले गेले होते आणि विविध राजवंशांनी त्याचे संरक्षण केल्याचा उल्लेख इतिहासात आहे.
हेही वाचा>>>
Travel : भारतातील एक दैवी शक्तीपीठ! 'येथे' पडला होता देवी सतीच्या स्तनाचा तुकडा? 'अशी' करा ट्रीप प्लॅन
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )