(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri 2023 : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, साडेतीन शक्तीपीठाच्या मंदिरांसह घरोघरी घटस्थापना, भाविकांमध्ये उत्साह
Navratri 2023 : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. या नऊ दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरात गर्दी दिसून येते.
Shardiya Navratri 2023 : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरात गर्दी दिसून येते. आपल्या देशात देवींना सर्वोच्च स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या देवींच्या मंदिरांसोबतच इतर महत्त्वाच्या मंदिराबाबत जाणून घ्या, या ठिकाणी नवरात्री साजरी करण्यात येत आहे.
सप्तशृंगी देवी मंदिर (अर्ध पीठ)
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठातील सप्तशृंगी देवी नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर 4800 फूट उंच सप्तशृंगी पर्वतावर विराजमान आहे. सह्याद्रीच्या सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगा पर्वत, जिथे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगरावर निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, जणू देवी आपल्याला निसर्गाची ओळख करून देते असे वाटते. साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. आज सकाळी 7 वाजता मंदिर संस्थानच्या कार्यालयात देवीच्या आभूषणांच्या महापूजा करण्यात आली आहे, संस्थानचे अध्यक्ष बी, व्ही. वाघ यांच्या हस्ते सपत्निक ही पूजा पार पडली. महापूजेनंतर महाआरती करण्यात येते. संस्थानच्या कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत देवीच्या आभूषणांची वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात येते.
रेणुका देवी मंदिर, (पूर्ण पीठ)
महाराष्ट्रातील माहूर प्रदेश रेणुका देवी मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. घटस्थापने पूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे. मांढरदेवी काळूबाई मंदिराची स्थापना सातारा जिल्ह्यातील वाई भागात डोंगराच्या 4650 फूट उंचीवर आहे. हिंदू धर्मातील हे अतिशय प्रसिद्ध मंदिर असून दरवर्षी जानेवारी महिन्यात काळूबाई जत्रा, यात्रा भरते.
तुळजा भवानी मंदिर,(पूर्ण पीठ)
सोलापूरपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेले तुळजा भवानी मंदिर महत्त्वाच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. सह्याद्री नदीवर वसलेल्या यमुनाचल पर्वताच्या कुशीत हे मंदिर आहे.
महालक्ष्मी मंदिर (पूर्ण पीठ)
महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ते महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूरच्या या महालक्ष्मी देवीच्या मंदिराला दक्षिणेची काशी असेही म्हणतात. या मंदिरात नवग्रह, भगवान सूर्य, महिषासुरमर्दिनी, विठ्ठल रखमाई, शिवाजी, विष्णू, तुळजा भवानी इत्यादी देवतांचीही पूजा केली जाते.
देवीची इतर प्रसिद्ध मंदिरे
चतुर्श्रृंगी मंदिर
सेनापती बापट रोडवर डोंगराच्या कुशीत वसलेले पुण्याचे प्रसिद्ध चतुरश्रृंगी मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. हे मंदिर शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. तुमच्या महाराष्ट्राच्या प्रवासादरम्यान या देवींच्या मंदिरांना भेट द्या आणि श्रद्धेची भावना अनुभवा.
मुंबा देवी मंदिर
मुंबा देवी मंदिर भुलेश्वर, मुंबई येथे आहे, ज्याच्या नावावरून मुंबई शहर हे नाव घेतले जाते. मुंबा देवी ही येथे राहणार्या कोळी जातीची कुलदैवत आहे. हे 400 वर्षे जुने मंदिर मुंबईत खूप प्रसिद्ध आहे.
वज्रेश्वरी मंदिर
मुंबईपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असलेले वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर वज्रेश्वरी देवीला समर्पित आहे. नवरात्रीचा पवित्र सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस मोठ्या थाटामाटात देवतांची पूजा केली जाते आणि मोठी जत्रा भरवली जाते.
एकवीरा देवी
लोणावळ्यातील कार्ला लेण्यांजवळ एकवीरा देवीचे प्राचीन मंदिर आहे. मान्यतेनुसार हे मंदिर येथील लेण्यांपेक्षा जुने आहे. असे म्हणतात की, पांडव वनवासात येथे पोहोचले तेव्हा देवी एकवीरा त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि त्यांच्या कार्याची दिशा तपासण्यासाठी तिने त्यांना मंदिर बांधण्याचे आव्हान दिले. पण मंदिर रातोरात बांधले पाहिजे, अशीही अट होती. पांडवांनी मंदिर बांधले. देवी त्याच्या भक्तीवर इतकी प्रसन्न झाली की तिने त्यांना आशीर्वाद दिला. एकवीरा देवी ही आगरी-कोळी समाजाची प्रमुख देवी असून ते तिला आपली कुलदैवत मानतात. देवी एकवीराच्या दर्शनासाठी दरवर्षी दूरदूरवरून आगरी-कोळी समाजाचे लोक येतात. तसं पाहायला गेलं तर वर्षभर येथे दर्शनाची मालिका सुरू असते. मात्र दरवर्षी चैत्र नवरात्री आणि नवरात्रीच्या काळात येथे भाविकांची संख्या खूप वाढते. यादरम्यान लाखो भाविक येथे येतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Navratri 2023 : यंदाची 'नवरात्र' खूप खास! 9 दिवस दुर्मिळ योगांचा संयोग, देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार