First Shravan Somvar 2023 Live Updates : आज पहिला श्रावणी सोमवार; राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची रीघ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.
LIVE
Background
मुंबई : आज श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा योग आला आहे. या निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलंय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर श्रावणी सोमवार निमित्तानं सजून गेलंय. शिवशंभोंच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह दिसून आला.
भीमाशंकर मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलीय. मंदीराच्या गाभाऱ्यात विधीवत पुजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भीमाशंकरला महाराष्ट्राच केदारनाथ देखील म्हटले जात.
छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर सजले
छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सजून गेलंय. बारा ज्योतीर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर. त्यामुळे शिवशंभोंच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह दिसून येतोय. पहाटे गाभाऱ्यात पूजा केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. पहाटेपासूनच भाविक बेल-फूलं वाहून तसेच दुग्धाभिषेक करुन शिवशंकराचं दर्शन घेत आहेत.
नागनाथ मंदिरात भाविकांची रिघ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग म्हणजे हिंगोलीतील औंढा नागनाथ. पहाटेपासून या मंदिरात भाविकांची रिघ सुरू आहे. मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. हेमाडपंथी असलेल्या या नागनाथ मंदिरात भाविकांची कायम रिघ असते.
शिखर शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने महादेवाच्या मंदीराला फुलांची सजावट करण्यात आलीय. या मंदिरात विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने अन्नछत्र देखील राबवले जातं.
वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बीडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं मंदिर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय. वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने भाविकांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात. त्यांना दर्शन घेणं सुलभ व्हावं यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेटस उभारण्यात आलेत.
दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. तर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर इथे आहे. श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळते.
अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी.पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमीचा योग, दर्शनासाठी शिवमंदिराच्या कमानीपर्यंत रांगा
First Shravani Somvar Ambernath : आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा योग जुळून आल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी तुफान गर्दी केली आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील मुख्य रस्त्यापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर हे तब्बल 963 वर्ष जुन असून दरवर्षी श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. यावर्षी श्रावणापूर्वी अधिक महिना देखील आल्यामुळे संपूर्ण महिनाभर मंदिरात भाविकांची गर्दी होती, त्यात आज मराठी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी हा योग जुळून आल्यामुळे भाविकांनी प्राचीन शिवमंदिरात भोलेनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यामध्ये केवळ अंबरनाथ बदलापूर उल्हासनगरच नव्हे तर संपूर्ण राज्यातून आलेल्या भाविकांचा समावेश आहे. त्यामुळेच भाविकांच्या मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील असलेल्या कमानीपर्यंत रांगा लागल्या आहेत. अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी देखील आज प्राचीन शिव मंदिरात येऊन भोलेनाथाचे दर्शन घेतलं. यावेळी पहिल्याच श्रावणी सोमवारी झालेली गर्दी ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचा आमदार केळकर यांनी सांगितले. तर मंदिराच्या आवारात परंपरागत पुजारी पाटील परिवाराकडून संपूर्ण श्रावण महिना भर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी रवी पाटील यांनी दिली.
परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिर भक्तांनी फुलले, पारदेश्वर हे देशातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग मंदिर
श्रावणी सोमवारनिमित्त मार्लेश्वरमध्ये मोठी गर्दी
First Shravani Somvar Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे देवस्थान देखील प्रसिद्ध आहे. श्रावणी सोमवारनिमित्त मार्लेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या ठिकाणी दाखल होत असतात. पहाटे तीन वाजल्यापासून मंदिरामध्ये अभिषेकाला सुरुवात होते. उंच उंच डोंगररांगांमध्ये हे देवस्थान आहे. फेसाळत कोसळणारा धबधबा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि भक्तिमय वातावरण असं इथलं चित्र मन प्रसन्न करून सोडते. दरम्यान संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये निमित्त भाविक मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होत असतात.