(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2023 : यंदा आषाढी यात्रा होणार आरोग्य वारी! लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, शिंदे फडणवीस सरकारची अनोखी भेट
Ashadi Wari 2023 : यंदा आषाढी यात्रेमध्ये लाखो विठ्ठल भक्तांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प शिंदे फडणवीस सरकारने केला आहे. जवळपास 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी या यात्रेत होणार असल्याने ही वारी आरोग्य वारी ठरणार आहे.
Ashadi Wari 2023 : यंदा आषाढी यात्रेमध्ये (Ashadi Wari) लाखो विठ्ठल भक्तांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) केला आहे. जवळपास 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी या यात्रेत होणार असल्याने ही वारी आरोग्य वारी ठरणार आहे. एका बाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला भुलवण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूर वारी करत असताना, राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी यंदाची वारी आरोग्य वारी करण्याचा चंग बांधला आहे. याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Dr Tanaji Sawant) यांच्यावर सोपवली असून जवळपास 10 हजार तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ लाखो वारकऱ्यांच्या सेवेत असतील.
वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर
उद्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह अनेक पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखीतळावर येत असून जवळपास 14 ते 15 लाखांचा समाज याठिकाणी जमणार आहे.दोन दिवस हे वारकरी इथे असून 28 जून रोजी सायंकाळी ते पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. दरम्यान वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. इथे 27 आणि 28 जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काळाच्या पाहणी दौऱ्यात डॉ. तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी रात्री याबाबत सर्व सूचना दिल्या आहेत. या महाआरोग्य शिबिराचे टी-शर्ट आणि फलकाचे अनावरण यावेळी त्यांनी केले.
यात्रेत जवळपास 15 ते 16 लाख भाविकांच्या आरोग्य तपासणी होणार
पालखी सोहळे पंढरपुरात दाखल झाल्यावर 29 जून आणि 30 जून रोजी दर्शन रांग असणाऱ्या गोपाळपूर पत्रा शेडजवळ दुसरे महाआरोग्य शिबीर सुरु होणार आहे. याचवेळी साडेतीन लाख भाविकांच्या निवासाची व्यवस्था असणारे तिसरे आरोग्य शिबीर सोलापूर रोडवरील 65 एकराजवळ ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्याच्या सोबत आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या 463 दिंड्यांची तपासणी संपूर्ण मार्गावर झाली असून यातही लाखो वारकऱ्यांची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. संपूर्ण यात्रेत जवळपास 15 ते 16 लाख भाविकांच्या आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी औषध साठे, वैद्यकीय उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
वारकऱ्यांना सरकारतर्फे विमा संरक्षण
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल.
हेही वाचा