National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?
What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो.
National Science Day 2024: आज 'राष्ट्रीय विज्ञान दिन' (National Science Day). 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रामन (C.V.Raman) यांनी भारतातील 'रामन इफेक्ट'चा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. यावरून विज्ञान आपल्या जीवनात काय करू शकतं, याचा अंदाज बांधता येतो. वैज्ञानिक यश केवळ आंतरराष्ट्रीय स्तरापुरतंच मर्यादित आहे, असं नाही. वैज्ञानिक भारतीय शास्त्रज्ञही मागे नाहीत. भारताने अनेक भौतिकशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनाही जन्म दिला आहे. असेच एक महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन होते, त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये अत्यंत दुर्मिळ शोध लावला. ज्याला त्यांच्या नावानं ‘रामन इफेक्ट’ किंवा रमन ‘स्कॅटरिंग’ असं नाव देण्यात आलं. या शोधांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत दर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो.
का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिवस'?
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
भारतात 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. भौतिकशास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धूळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हे पसरलेले प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच 'रामन इफेक्ट' म्हणतात. या शोधासाठी त्यांना नोबेल व्यतिरिक्त 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार 'भारतरत्न'ने गौरवण्यात आलं.
कशी झाली 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरी करण्याची सुरुवात?
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली 28 फेब्रुवारी.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचं उद्दिष्ट
लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचं महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्य प्रदर्शित करणं. सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरं केलं जातं. देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणं. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणं आणि त्यांना प्रेरित करणं आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणं हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगानं पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.