Monsoon Travel : पावसाळ्यात ट्रेकिंगची खरी मजा अनुभवा, पण सांभाळून! भारतातील 'ही' ठिकाणं मानली जातात सुरक्षित
Monsoon Travel : भारतात अशी काही ठिकाणं आहेत, ज्यांना पावसाळ्यात भेट देणे सर्वोत्तम मानले जाते, तसेच या ऋतूत 'ही' ठिकाणं सुरक्षित मानली जातात.
Monsoon Travel : यंदाच्या पावसाळ्यात बाहेर फिरायला जायचं मन होतंय. पण कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना प्लॅन पुढे ढकलावा लागतोय. पावसाळ्यात तुम्ही बाहेर फिरायला जाल, पण योग्य ती काळजी घेऊनच.. कारण गेल्या काही दिवसांमध्ये लोणावळा येथील धबधब्यामध्ये अख्खं कुटुंब वाहून गेलं तर ताम्हीणी घाटातील धबधब्यात एका तरुणाचा नाहक बळी गेला, एक नाही अशा अनेक घटना विविध ठिकाणी घडत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही योग्य काळजी घेतली तर ही ठिकाणं सुरक्षित मानली जातात, सोबत तुम्ही ट्रेकिंगची मजाही अनुभवू शकाल. जाणून घ्या...
भारतात 'या' ठिकाणी पावसाळ्यात फिरण्याची खरी मजा
पावसाळा हा प्रवासासाठी आवडीचा ऋतू मानला जातो. पण गेल्या काही दिवसात लोणावळा, ताम्हिणी घाट येथील दुर्घटना पाहता फिरायला जाताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सततच्या पावसामुळे रस्ते खराब होतात, दरड कोसळण्याची शक्यता असते आणि अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण होते, पण दुसरीकडे भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात फिरण्याची खरी मजा आहे. ट्रेकिंग करताना, तुम्हाला अशी ठिकाणे पाहायला मिळतात, ज्यामुळे तुमची ट्रीप अद्भुत आणि संस्मरणीय बनवू शकतात. भारतात अशी काही ठिकाणं आहेत, ज्यांना पावसाळ्यात भेट देणे सर्वोत्तम मानले जाते, कारण त्या काळात भारतातील काही ठिकाणं आणखी सुंदर बनतात. तसेच या ऋतूत ही ठिकाणं सुरक्षित मानली जातात. जर तुम्हीही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणांचा तुमच्या यादीत समावेश करू शकता.
सिंहगड ट्रेक, पुणे
पुणे आणि मुंबईकरांनो पावसाळ्यात भेट देण्यासाठी सिंहगड हे ठिकाण सर्वोत्तम आहे. या ठिकाणचे हवामान बहुतेक महिने आल्हाददायक असते, तर पावसाळ्यात ते अधिक रोमँटिक होते. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही पुण्यातील सिंहगड किल्ला ट्रेकिंगला जाणं अजिबात चुकवू नका. गडावर जाण्याची वाट इतकी नयनरम्य आहे की, तुम्हाला त्यात हरवल्यासारखं वाटेल. सिंहगड ट्रेकिंग सुमारे 3 किमी लांब आहे. ज्याचे ट्रेकिंग पूर्ण होण्यासाठी सुमारे 1 तास लागतो.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड
उत्तराखंड येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फिरण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हे महिने सर्वोत्तम मानले जातात. या काळात इथे आल्यावर एकाच वेळी अनेक प्रकारची फुले पाहायला मिळतात. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचाही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे. येथे 500 हून अधिक प्रजातींची फुले येतात. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स यावर्षी 1 जूनपासून पर्यटकांसाठी खुली झाली असून ती 30 ऑक्टोबरपर्यंत खुली राहणार आहे. उशीर न करता योजना करा.
हम्ता पास, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील हम्ता पासचा समावेश करण्यासाठी मान्सून प्लॅन तयार करावा. समुद्रसपाटीपासून 14,100 फूट उंचीवर असलेले हे ठिकाण पावसाळ्यात पूर्णपणे हिरवेगार दिसते. येथे ट्रेकिंग करताना तुम्हाला पर्वत, नद्या आणि धबधबे दिसतात. तर येथे ट्रेकिंग करणे सोपे नाही. कुल्लूपासून सुरू झालेले हे ट्रेकिंग पूर्ण व्हायला 5 ते 6 दिवस लागू शकतात.
मुल्लायनगिरी, कर्नाटक़
कर्नाटकातील मुल्लायनगिरी ट्रेक हे ट्रेकिंग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यातही ते सुरक्षित असते. मुल्लायनगिरी हे कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते. मुल्लायनगिरी ट्रेकिंग सुमारे 10 किमी लांब आहे. ट्रेकिंग करताना तुम्ही कॅम्पिंग आणि रॉक क्लाइंबिंगचाही आनंद घेऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : साईंचं बोलावणं..! भारतीय रेल्वे तुमची शिर्डीला जाण्याची इच्छा पूर्ण करणार, कमी बजेटमध्ये टूर पॅकेज लाँच
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )