Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे
Womens Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे.
International Womens Day 2024 : 'महिला' ही एकमेव शक्ती आहे, जी जग बदलू शकते... देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या या ओळी आजच्या काळात अगदी तंतोतंत खऱ्या ठरतात. आजच्या युगात, महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशातच प्रत्येक क्षेत्रात महिलांनी सुरुवातीपासूनच आपल्या हक्काचं यश संपादन केलं आहे.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Womens Day) आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे.
देशातील पहिल्या महिला लोको पायलट
देशाच्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची गाठत आहेत, ज्याचे त्यांनी कधी काळी स्वप्न पाहिले होते. आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या महिला लोको पायलटबाबत सांगणार आहोत. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून सुरेखा यादव होत्या. सुरेखा यादव यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा ट्रेन चालवून आपलं नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानात नोंदवलं. लोको पायलट झाल्यानंतर सुरेखा यांनी सर्व महिलांसमोर एक आदर्श ठेवला की, महिला कोणाहीपेक्षा कमी नाहीत आणि त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं पुढे जाऊ शकतात. सुरेखा या पहिल्या महिला लोको पायलट आहेत आणि वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला देखील आहेत.
देशातील पहिली महिला ऑटो चालक
पहिल्या महिला पीएम, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि अगदी पहिल्या महिला शिक्षिका यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का? देशातील पहिली महिला ऑटो चालक कोण आहेत? नाही ना, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, देशातील पहिली महिला ऑटो ड्रायव्हर कोण आहेत, शीला डावरे या देशातील पहिल्या महिला ऑटो ड्रायव्हर आहेत. शीला डावरे या पुण्यात राहतात आणि त्या अवघ्या 18 वर्षांच्या असल्यापासून ऑटो चालवत आहेत. शीला डावरे यांनी मेटाडोर आणि स्कूल बसही चालवली आहे. आता त्यांची स्वतःची ट्रॅव्हल कंपनी आहे. शीला डावरे यांच्या नावावरही लिम्का बुक रेकॉर्ड आहे.
देशातील पहिल्या महिला डॉक्टर
19व्या शतकात जेव्हा स्त्री शिक्षणावर भर देण्यात आला, तेव्हा आपल्या देशाला पहिल्या महिला डॉक्टर मिळाल्या आणि त्या आनंदी गोपाळ जोशी होत्या. आनंदी गोपाळ जोशी या वयात डॉक्टर झाल्या, ज्या वयात महिलांना उच्च शिक्षण घेणं कठीण होतं. मात्र, देशाला वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्या महिला डॉक्टरचा निरोप घ्यावा लागला. आनंदी गोपाल जोशी यांना लहानपणापासूनच खूप त्रास सहन करावा लागला होता. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या विधुराशी झाला. पण लग्नानंतरही त्यांच्या पतीनं त्यांना मोलाची साथ दिली. विदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. त्यामुळे आनंदीबाईंच्या यशात त्यांच्या पतीचाही तितकाच मोठा वाटा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Women's Day 2024: महिला दिवस आणि जांभळ्या रंगाचं महत्त्व काय?