Important Days in February 2023 : प्रेमाचा महिना, मराठी मातृभाषेचा दिन आणि अनेक फेस्टिव्हल्सची मांदियाळी; 'ही' आहे महत्त्वाच्या दिवसांची यादी
Important Days in February 2023 : नवीन वर्षातील दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Important Days in February 2023 : नवीन वर्षातील दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. फेब्रुवारी महिना हा विविध अंगांनी खास आहे. अनेकजण हा महिना प्रेमाचा महिना म्हणूनही साजरा करतात. पण त्याचबरोबर, या महिन्यात अनेक फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. तसेच, आपल्या मराठी मातृभाषेचा दिन सुद्धा फेब्रुवारी महिन्यातच येतो. या निमित्ताने जाणून घेऊयात या महिन्यातील महत्त्वाचे दिवस कोणते आहेत.
1 February – Indian Coast Guard Day
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना शांततेच्या काळात म्हणजेच युद्ध सुरु नसतानाच्या वेळी भारतीय समुद्र किनाऱ्यांचं रक्षण करण्याच्या हेतूने करण्यात आली. भारतीय संसदेने (Parliament) 18 ऑगस्ट 1978 रोजी तटरक्षक अधिनियम 1978 या कायद्याला मंजुरी दिली होती. भारतीय तटरक्षक दलाचं 'वयम रक्षाम' हे ब्रीदवाक्य आहे. 18 ऑगस्ट 1978 ला संसदेनं मंजुरी दिली असली तरी भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नवीन सशस्त्र सुरक्षा दल म्हणून याची सुरुवात 1 फेब्रुवारी 1977 ला झाली होती. भारतीय नौदलाचं काम हे युद्धकालीन असावं आणि युद्ध सुरु नसताना सागरी सीमांची जबाबदारी तटरक्षक दलाकडे असावी या भूमिकेतून याची स्थापना करण्यात आली.
1 February – जॅकी श्रॉफ
जॅकी श्रॉफ हे हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. 1973 साली 'हीरा पन्ना' या हिंदी चित्रपटातल्या छोट्याश्या खलनायकी व्यक्तिरेखेद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 1983 सालच्या 'हीरो' चित्रपटाने त्यांना मोठं नाव मिळवून दिले. आजवर त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांत काम केले आहे.
4 February - World Cancer Day
भारतात दरवर्षी हजारो लोकांचा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने मृत्यू होतो. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात येतो. कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराबाबत जागरूकता पसरविण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं.
4 February to 12 February- Kala Ghoda Festival
देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टीवल म्हणून या फेस्टीवलची ओळख आहे. दरवर्षी मुंबईत या फेस्टीवलचं आयोजन केलं जातं. या फेस्टीवलचं यंदाचं हे तेविसावं वर्ष आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा फेस्टीवल आयोजित करण्यात येतो. या फेस्टीवलचं वैशिष्ट्य म्हणजे 40 पेक्षा जास्त कलाप्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे कलाप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे.
4 February - उर्मिला मातोंडकर
ऊर्मिला मातोंडकर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री आहे. मराठी भाषिक कुटुंबात जन्मलेल्या ऊर्मिलेने 1980 साली 'कलयुग' नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1991 साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरुणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. तिने अभिनय केलेले रंगीला (इ.स. 1995), जुदाई (इ.स. 1997) आणि सत्या (इ.स. 1998) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत.
5 February - संत रविदास जयंती
संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
5 February - अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चन हा एक आघाडीचा सिने-अभिनेता आणि निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने 2000 सालच्या 'रेफ्युजी' ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, काही चित्रपटांत त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना अचंबित केले. तर, काही चित्रपटांत प्रेक्षकांना त्याची भूमिका फारशी आवडलेली नाही. अभिषेक बच्चनला 3 फिल्मफेअर पुरस्कार, 1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
8 February - Safer Internet Day (second day of the second week of February)
सर्वप्रथम 2004 साली युरोपमध्ये 'सेफर इंटरनेट डे' ( Safer Internet Day) साजरा करण्यात आला. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. हा दिवस जगभर 'सेफर इंटरनेट डे' म्हणजे सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
10 February - National De-Worming Day
भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा देशातील प्रत्येक बालक जंतमुक्त करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. अल्प कालावधीत मोठ्या संख्येने मुलांपर्यंत पोहोचणारा हा सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आहे.
12 February – Darwin Day
डार्विन आणि उत्क्रांतिवाद हे जणू एक समीकरणच मानले जाते. उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश पदार्थशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक होते. विज्ञानाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांना साध्या सरळ प्रयोगांच्या माध्यमाने जगापुढे आणले. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 साली इंग्लंड येथील शोर्पशायर शहरातील श्रेब्स्बुरी या गावी झाला.
12 February - Abraham Lincoln's Birthday
12 फेब्रुवारी इ.स.1809 हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 'अब्राहम लिंकन डे' किंवा 'लिंकन डे' म्हणूनही ओळखला जातो. अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. ते अमेरिकेतील खूपच लोकप्रिय आणि यशस्वी राष्ट्राध्यक्ष होते.
13 February - जागतिक रेडिओ दिन (World Radio Day)
आजच्या प्रमाणे इंटरनेटचा विकास न झालेल्या काळात रेडिओ हेच एक मनोरंजन आणि शिक्षणाचं माध्यम होतं. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. त्यामुळे 13 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली रेडिओ क्लब इथे झाली.1936 साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले.
13 February – Sarojini Naidu Birth Anniversary
भारतीय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1979 ला एका बंगाली कुटुंबात झाला. सरोजिनी नायडू यांचे माहेरचे आडनाव नायडू होते तर सासरचे आडनाव चट्टोपाध्याय असे होते. सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींबरोबर लढलेल्या सरोजिनी नायडू यांना 'भारताची कोकिळा' असेही म्हटले जात होते.
14 February - Valentines Day
तरूणाईत प्रचंड लोकप्रिय असणारा दिवस म्हणजे व्हेलेंटाईन डे. 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा हा दिवस आहे. साधारणपणे 1700 वर्षापूर्वी, तिसऱ्या शतकात रोममध्ये व्हॅलेंटाईन नावाचा एक सेन्ट अर्थात संत होऊन गेला. त्यावेळी रोममध्ये क्लॉडियस दुसरा या राजाचे राज्य होतं. या राजाला जग जिंकण्याची मनिषा होती. त्यामुळेच या दिनाला विशेष महत्व आहे. साधारणपणे 7 ते 14 फेब्रुवारी असा एक आठवडा व्हेलेंटाईन विक (Valentines week) साजरा करण्याची प्रथा आहे.
7 फेब्रुवारी - रोझ डे, 8 फेब्रुवारी - प्रपोज डे, 9 फेब्रुवारी- चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी - Teddy day, 11 - प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारी - Hug Day, 13 फेब्रुवारी - Kiss Day, 14 फेब्रुवारी - व्हेलेंटाईन डे असे सात दिवस साजरे केले जातात.
15 February - रणधीर कपूर
रणधीर कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. 1971 मध्ये त्यांनी कल आज और कल या चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारली. त्यांनी हमराही, जवानी दिवानी, पोंगा पंडित, रामपूरका लक्ष्मण, कस्मे वादे सह अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. रणधीर कपूर
हे राज कपूर यांचे सगळ्यात मोठे पुत्र आहेत. रणधीर कपूर यांना करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोन मुली आहेत.
18 February - महाशिवरात्री
महाशिवरात्री (MahaShivratri 2023) हा हिंदू धर्मातील विशेष सणांपैकी एक मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. यावेळी 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी महा शिवरात्री साजरी होणार आहे. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. भगवान शंकराची कृपा आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस विशेष मानला जातो.
18 February to 27 February - ताज महोत्सव
शाहजहानने 1628-1658 काळापासून पाचवे मुघल सम्राट म्हणून राज्य केले आणि त्याची आवडती पत्नी मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून ताजमहाल बांधले. मुघल काळाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, ताज महलसमोर फेब्रुवारीमध्ये 'ताज महोत्सव' नावाचा 10 दिवसांचा वार्षिक कार्यक्रम साजरा केला जातो. आग्रा पर्यटन विभागामार्फत या उत्सवाचे आयोजन केले जाते.1992 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाची भव्यता अनेक दशकांमध्ये अनेक पटींनी वाढली आहे. जगभरातील हजारो लोक आणि प्रवाशांना आकर्षित करणारा हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांतील कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थाने परिपूर्ण असा उत्सव आहे.
19 February - छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. शिवाजी महाराजांचा जन्मदिन हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. समाजाच्या सर्व स्तरांतून शिवजयंती साजरी होताना प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. या दिवशी काहीजण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जाते.
20 February - Arunachal Pradesh Foundation Day
अरुणाचल प्रदेश हे 20 फेब्रुवारी 1987 रोजी भारताचे 24 वे राज्य बनले. 1962 पूर्वी अरुणाचल हे नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA) म्हणून ओळखले जात होते. 1972 मध्ये ते केंद्रशासित प्रदेश बनले आणि त्याला अरुणाचल प्रदेश असे नाव मिळाले. आणि 20 फेब्रुवारी 1987 रोजी त्याचे नाव भारतीय संविधानात 24 वे राज्य म्हणून नोंदवले गेले.
20 February - World Day of Social Justice
दरवर्षी 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो. सामाजिक न्यायाबद्दल जनजागृती करणं, हा या दिवसामागजचा मुख्य हेतू. थेट मानवतेशी संबंध असणाऱ्या या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांकडूनच करण्यात आली. विविध स्तरांवर होणारा भेदभाव दूर लोटत एकतेच्या मार्गावर सर्वांनाच एकवटणं हा हासुद्धा त्यामागचा आणखी एक हेतू.
21 February - International Mother Language Day
आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतीक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस युनेस्कोच्या वतीनं (UNESCO) 1999 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 2002 साली मान्यता दिली.
23 February - संत गाडगेबाबा जयंती
गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावतीतील शेंडगाव येथे झाला. ते महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.
24 February - संजय लीला भन्साळी
संजय लीला भन्साळी हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. 1996 साली त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक म्हणून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मावत, राम लीला, बाजीराव-मस्तानी यांसारखे अनेक हिट चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने पाहतात.
24 February - जागतिक मुद्रण दिन (Printers’ Day)
प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे.
26 February - स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी आणि लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांना पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि अशी शिक्षा झालेले हे एकमेव स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी होते."ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला" या सुप्रसिद्ध गाण्यातून त्यांनी मातृभूमीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
27 February - मराठी राजभाषा दिन (Marathi languague Day)
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो. हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा दिन आहे. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा आहे. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात झाला. कुसुमाग्रज हे मराठी लेखक होते. 1987 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
28 February – राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day)
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.
महत्त्वाच्या बातम्या :