Important days in 21st April : 21 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
Important days in 21st April : एप्रिल महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
Important days in 21st April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 21 एप्रिलचे दिनविशेष.
1526 : इब्राहिम खान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मुघल साम्राज्याची भारतात सुरुवात
पहिली लढाई बाबर आणि इब्राहीम लोदी यांमध्ये दिल्लीच्या तख्ताकरीता 21 एप्रिल 1526 मध्ये झाली. उत्तर भारतात मुसलमानी राजवट सुरू झाल्यापासून बाबरपर्यंत जे सुलतान झाले ते बहुतेक अफगाण होते, मोगल नव्हते. बाबर, तुर्क आणि मोगल यांचा वाररसदार होता. त्याने अफगाणिस्तान आणि मध्य आशिया या दोन प्रदेशांत आपले राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यास म्हणावे तसे यश आले नाही. म्हणून त्याने आपले लक्ष भारताकडे वळविले. भारतात आपले राज्य स्थिर करण्याच्या उद्देशाने त्याने भारतावर पाच-सात स्वाऱ्या केल्या. त्या सर्व स्वाऱ्यांत त्यास उणेअधिक यश मिळत गेले. यामुळे भारतात राज्य स्थापण्याचा त्याने पक्का निश्चय केला.
दुसरी लढाई - एका बाजूस अकबर आणि त्याचा पालक बैरामखान आणि दुसऱ्या बाजूस हेमू (हीमू) यांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी 5 नोव्हेंबर 1556 रोजी झाले.
तिसरी लढाई - 14 जानेवरी 1761 रोजी मराठे आणि अफगाण यांत झालेले युद्ध.
1910 : मार्क ट्वेन विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन
विख्यात अमेरिकन विनोदकार आणि वास्तववादी कादंबरीकार. यांचे खरे नाव सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमन्स असे आहे. ‘द सेलिब्रेटेड जंपिंग फ्रॉग’(1867) ह्या विनोदी लेखामुळे ते प्रकाशात आलाे. त्यानंतर द ॲड्व्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर (1876) आणि द ॲड्व्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन (1884) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्याही गाजल्या.
1926 : इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.
प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो. दुसरी एलिझाबेथ ही राष्ट्रकुल परिषदेमधील युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन द्वीपसमूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिस ह्या 16 सार्वभौम देशांची राणी आहे. ती वैधानिक दृष्ट्या ह्या देशांची सम्राज्ञी असली तरीही तिचे सामर्थ्य केवळ औपचारिक आहे. इंग्लंडची राणी किंवा ब्रिटनची राणी ह्याच नावाने एलिझाबेथ ओळखली जाते. एलिझाबेथचा जन्म 21 एप्रिल, इ.स. 1926 रोजी लंडन येथे झाला. तिचे वडील जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इ.स. 1952 रोजी एलिझाबेथला राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून गेली 68 वर्ष राजघराण्यावर एलिझाबेथची सत्ता आहे.
1934 : मराठी संस्कृतीच्या जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्मदिन
गुंथर सोन्थायमर या भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकधर्म, लोकसंस्कृती, लोकदैवते, धर्मशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक आणि त्याविषयी संशोधन करणाऱ्या संशोधक होत्या. दक्षिण भारतातील पशुपालक समाजाच्या धर्मश्रद्धांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. तसेच सोन्थायमर यांनी खंडोबाचा आणि परिसरातील धनगरांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला होता.
1938 : पाकिस्तानी कवी सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन
मुहम्मद इक्बाल मसूदी हे अविभाजित भारतातील प्रसिद्ध कवी, नेते आणि तत्त्वज्ञ होते. उर्दू आणि पर्शियन भाषेतील त्यांची कविता आधुनिक काळातील सर्वोत्तम कवितांमध्ये गणली जाते. मुहम्मद इक्बाल मसूदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी "तराना-ए-हिंद" लिहिले, ज्याचे सुरुवातीचे शब्द - "सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा" असे होते.
भारतीय नागरी सेवा दिन.
21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून 2006 पासून हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून नियमितपणे साजरा होत आहे. या दिवशी, नागरी सेवक नागरिकांच्या कारणासाठी स्वतःला समर्पित करतात.
1950 : हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 एप्रिल 1950 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘सीआयडी’या प्रसिद्ध मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. त्याचबरोबर वास्तव, दे धक्का, उत्तरायण यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
1997 : भारताचे 11 वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
इंद्रकुमार गुजराल हे भारताचे 11 वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म पंजाब प्रांतातील झेलम या शहरात झाला. त्यांनी इ.स. 1942च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते. एप्रिल 21, इ.स. 1997 रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. मार्च 30, इ.स. 1997 रोजी संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा येणाऱ्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतला.11 एप्रिल, इ.स. 1997 रोजी देवेगौडा सरकार कोसळले. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
2013 : भारतीय महिला गणितज्ञ शकुंतलादेवी यांचे निधन.
वयाच्या 6व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले. शकुंतला देवी 1944 मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. 1976 साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली. जगप्रसिद्ध "ह्युमन कॉम्प्युटर" म्हणून त्यांची ख्याती आहे. शकुंतलादेवी यांच्या आयुष्यावर 'शकुंतलादेवी' हा चित्रपट तयार करण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनने शकुंतला देवीची भूमिका साकारली होती.
महत्वाच्या बातम्या :