(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Homemade Hair Oil : केसगळतीने हैराण झालाय? 'हा' उपाय करुन पाहाच; केस होतील सुंदर आणि लांबलचक
Hairfall Remedies : पावसाळ्यात केसगळतीची समस्या खूप सामान्य आहे. पण, याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नक्की काय करायला हवं जाणून घ्या. (Homemade Hair Oil)
मुंबई : सुंदर, जाड आणि लांब केस (Hair) प्रत्येकाला हवे असतात. पण, केस गळतीमुळे अनेकांची ही इच्छा काही पूर्ण होत नाही. विशेषत: पावसाळ्यात केस गळणे आणि केस तुटण्याची समस्या जास्त असते. दमट वातावरणामुळे किंवा केस ओले राहिल्यामुळे पावसाळ्यात केस गळतीचे प्रमाण वाढते. यावर उपाय म्हणून बाजारात अनेक खर्चिक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण, तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
पावसाळ्यात केसगळतीची समस्या खूप सामान्य आहे. पण, याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नक्की काय करायला हवं जाणून घ्या. पावसाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, घरच्या घरी तेल तयार करुन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.
खोबरेल तेल आणि जास्वंद यांच्यापासून तयार केलेलं तेल
साहित्य
- एक कप खोबरेल तेल
- एक मूठभर कढीपत्ता
- दोन चमचे आवळा पावडर किंवा सुकलेला आवळा
- दोन टीस्पून मेथी दाणे
- दोन जास्वंदाची फुलं
केसांचे तेल तयार बनवायचं कसं?
- एक काचेची बॉटल घ्या आणि त्यामध्ये खोबरेल तेल ओता.
- आता त्यात कढीपत्ता, आवळा पावडरसह इतर सर्व साहित्य टाका आणि झाकण घट्ट बंद करा.
- एक ते दोन आठवडे हे बॉटल दररोज सुमारे 3 तास सूर्यप्रकाशात ठेवा.
- या तेलाचा रंग गडद होईपर्यंत या तेलाला सूर्यप्रकाश दाखवा.
- तेलाचा रंग गडद झाल्यानंतर हे तेल वापरासाठी तयार आहे.
- तेल हलकं गरम करा आणि केसांना मॉलिश करा.
तेल वापरण्याची नेमकी पद्धत
वापरण्याआधी हे तेल छोट्या वाटीत घेऊन डबल बॉयलर पद्धतीने कोमट करा आणि त्यानंतरच केसांना लावा. किमान पाच मिनिटे केसांना हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर किमान 30 ते 40 मिनिटे हे तेल केसांना लावून ठेवा. यानंतर तुम्हील शॅमपूने केसं धुवू शकता. तुम्ही हे तेल रात्री केसांना लावून रात्रभर ठेवू शकता, त्यानंतर सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळा या तेलाचा वापर करा, तुम्हांला केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :