पावसाळ्यात रक्तवाहिन्यांचे आजार वाढलेत! कशी घ्यायची योग्य काळजी? जाणून घ्या डॉक्टरांचं म्हणणं
पावसाळ्याचा दिवसात वाढलेली आर्द्रता आणि पाण्यामुळे होणारे संसर्ग यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि पेरिफेरल आर्टरीचे आजार (PAD) सारख्या रक्तवाहिन्यांच्या आजारांमध्ये वाढ होते.

मुंबई : पावसाळ्याचा दिवसात वाढलेली आर्द्रता आणि पाण्यामुळे होणारे संसर्ग यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि पेरिफेरल आर्टरीचे आजार (PAD) सारख्या रक्तवाहिन्यांच्या आजारांमध्ये वाढ होते. गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात अनेकदा पाण्यामुळे होणारे आजार आणि त्वचेच्या संसर्गात वाढ होते, हे प्रत्येकालाच माहित आहे. मात्र अंतर्निहित रक्तवाहिन्यांच्या आजार असलेल्या व्यक्तींसाठी हा ऋतू धोकादायक ठरतो. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा रक्ताभिसरणाच्या समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण दमट हवामानामुळे सूज येणे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि पायांचे गंभीर संक्रमणाची शक्यता वाढते. दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा जेणेकरुन पावसाळ्यातही निरोगी राहता येईल.
रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे शरीराच्या रक्तवाहिन्या, विशेषतः धमन्या आणि शिरा प्रभावित होतात. सामान्य आजारांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT), पेरिफेरल आर्टरीचे आजार (PAD) आणि क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी(CVI) यांचा समावेश होतो. या परिस्थितींमुळे अनेकदा रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येतो, रक्तवाहिन्यांना सूज येते, वेदना होतात आणि संसर्गाची शक्यता वाढते.
चुकीची जीवनशैली, धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्येमुळे अनेकदा रक्तवहिन्यासंबंधी आजार होऊ शकतात. यावेळी पाय दुखणे, पायांमध्ये सूज आणि जडपणा येणे, फुगलेल्या शिरा ,पायांच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा जखमा बरे होण्यास वेळ लागणे अशी लक्षणे दिसून येतात.
डॉ. अशांक बन्सल पुढे सांगतात की, पावसाळ्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या रक्तवहिन्यासंबंधी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात साचलेले पाणी, ओले कपडे आणि जास्त आर्द्रता हे बुरशीजन्य संसर्गासाठी योग्य वातावरण तयार करते. हे घटक त्वचेवर सूज निर्माण करतात आणि संसर्गाचा धोका वाढून रक्तवहिन्यासंबंधी समस्या वाढु शकतात. म्हणूनच, रक्ताभिसरण बिघडलेल्या भागात संक्रमण वेगाने पसरू शकते, ज्यामुळे अल्सर, सेल्युलायटिस किंवा गँगरीनचा धोका वाढतो.
गंभीर प्रकरणांमध्ये या गुंतागुंतीमुळे रुग्णालयात दाखल होणे किंवा संक्रमित भाग कापावा लागू शकतो. म्हणून, पाय कोरडे आणि स्वच्छ राहतील खात्री करा, ओल्या कपड्यांमध्ये किंवा पादत्राणांमध्ये जास्त वेळ राहणे टाळा, जर तुम्हाला तुमच्या तज्ज्ञांनी सल्ला दिला असेल तर कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करा, पायांच्या रंगात बदल, वेदना किंवा सूज याकडे लक्ष द्या.
पायांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निरोगी आहार आणि रक्तातील साखरेची पातळी समतोल राखणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात रक्तवहिन्यासंबंधी समस्या वाढू नयेत म्हणून या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा. तुमच्या श्वसन, त्वचा आणि हृदयाच्या आरोग्याप्रमाणेच, रक्तवहिन्यासंबंधी आरोग्य देखील तुमची प्राथमिकता असली पाहिजे आणि म्हणून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
डॉ. अशांक बन्सल - व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट, सुराणा सेठिया हॉस्पिटल, चेंबूर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























