Health Tips : ब्रेन ट्यूमर समजून घेताना; काय आहेत लक्षणं, कारणं आणि उपचार? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Health Tips : ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील पेशींची असामान्य वाढ असते, जी सौम्य घातकही असू शकते. त्यांचा प्रभाव आकार, स्थान आणि त्याच्या वाढीच्या दरानुसार बदलतो. यासाठी वेळीच वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.

Health Tips : जगभरात 8 जून हा दिवस वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे (World brain Tumor Day) म्हणून पाळला जातो. जागतिक ब्रेन ट्यूमर दिनानिमित्त, ट्यूमरवरील उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी आणि रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी वेळीच निदानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली जाते. या लेखाच्या माध्यमातून डोंबिवली एम्स हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. रवी सांगळे यांनी ब्रेन ट्यूमरची कारणे, लक्षणे आणि उपचारांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील पेशींची असामान्य वाढ असते, जी सौम्य किंवा घातकही असू शकते. त्यांचा प्रभाव आकार, स्थान आणि त्याच्या वाढीच्या दरानुसार बदलतो, परंतु, यासाठी वेळीच वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. ब्रेन ट्यूमरची कारणे अस्पष्ट आहेत. परंतु, अनुवंशिकता, वय, कौटुंबिक इतिहास आणि पर्यावरणीय घटक याचा धोका वाढवू शकतात.
ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते आणि जागरूकतेच्या अभावामुळे ते शांतपणे सहन केले जातात. सततची डोकेदुखी, विशेषतः सकाळच्या वेळी होणारी मळमळ किंवा डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करु नये कारण ती ब्रेन ट्यूमरची लक्षणं असू शकतात. शिवाय, लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता, बोलताना अडखळणे किंवा एखादी गोष्ट चटकन न समजणे, वर्तणुकीत बदल, शरीराच्या एका बाजूस आलेला कमकुवतपणा, अंधुक दृष्टी, चक्कर येणे, आकडी येणे आणि शारीरीक संतुलन साधता न येणे ही देखील ब्रेन ट्युमरची लक्षणं आहेत.
निदान कसे करावे?
ब्रेन ट्यूमरचे निदान एमआरआय किंवा सीटी स्कॅन सारख्या इमेजिंग चाचण्या वापरून केले जाते, जे ट्यूमरचा आकार आणि स्थान शोधण्यास मदत करतात. काही प्रकरणांमध्ये, ट्यूमरचा प्रकार निश्चित करण्यासाठी बायोप्सी केली जाते. यासाठी वेळीच निदान करणे महत्त्वाचे आहे कारण ते ट्यूमर वाढण्यापूर्वी किंवा पसरण्यापूर्वी वेळेवर उपचार करण्यास अनुमती देते. यामुळे बरे होण्याची शक्यता सुधारते आणि रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
मेंदूच्या ट्यूमरमुळे स्मृती कमी होणे, दृष्टी दोष किंवा बोलताना अडखळणे आणि हालचाल किंवा शारीरीक संतुलनात अडचण यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात. जर वेळीच उपचार न केले नाही तर रुग्णांमध्ये कायमचे मेंदूचे नुकसान होऊ शकते.
ब्रेन ट्यूमरचे उपचार
ब्रेन ट्यूमरवरील उपचार हे ट्यूमरचा प्रकार, आकार आणि स्थान यांसह विविध घटकांवर अवलंबून असतात. तज्ञ तुमच्यासाठी अचूक उपचार ठरवतील. रुग्णाला ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी आणि ट्यूमरच्या वाढीला लक्ष्य करण्यासाठी केमोथेरपीचा सल्ला दिला जातो. हल्ली रुग्णांना टार्गेटेड आणि इम्युनोथेरपीचा देखील सल्ला दिला जाऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, वेळेवर उपचार करणे रुग्णासाठी जीवनरक्षक ठरते. काहींना वाचा गमावणे, चालणे अशक्य होणे आणि दैनंदिन कामे सहजतेने करणे यांसारख्या लक्षणांसाठी स्पीच किंवा रिहॅबिलेशन थेरपीची आवश्यकता भासू शकते. उपचारानंतरही रुग्णांनी डॉक्टरांकडे नियमित फॉलोअप घ्यावे. उपचारानंतर रुग्णांनी संतुलित जीवनशैलीचे पालन करावे आणि धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन टाळून तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करावा.
हे ही वाचा :
Eye Care : साठीनंतर 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी; नियमित करा मोतीबिंदू तपासणी, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























