(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सणासुदीच्या दिवसांत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स; काही दिवसांतच फरक जाणवेल
Health Tips : तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Health Tips : डिसेंबर महिना सुरु झाला की नाताळ सणाची चाहूल लागते. नाताळ सणाबरोबरच अनेक आनंदाचे, उत्साहाचे सण देखील साजरे केले जातात. सण म्हटला की गोडाधोडाचे पदार्थ, चॉकलेट्स हे सगळं आलंच. अशा अनेक तळलेल्या आणि गोड पदार्थांचा मनमुराद आनंद घेतला जातो. लहान मुलांसाठी जरी हा नाताळ हा सण सुट्टी, मजा, मस्ती आणि खूप सारे गोडाधोडाचे पदार्थ खाणारा असला तरी मात्र उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांसाठी मात्र चांगले नाही.
या संदर्भात मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल्सच्या कन्सल्टण्ट डायबिटोलॉजिस्ट डॉ. मिता साहा यांनी सांगितले की, “साधारणपणे सणासुदीच्या हंगामानंतर मधुमेह असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येते. काहीजण मिठाई सेवनासंदर्भात अतिरेक करतात आणि काहीजण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी येतात. दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी याबाबतीत योग्यरित्या व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. आज, ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाईसेस आहेत, जे लोकांना सतत अद्ययावत ग्लुकोज पातळी ट्रेंडमध्ये मदत करतात, मधुमेह असलेल्या लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि योग्य टाइम-इन-रेंज (टीआयआर)मध्ये राहण्यास मदत करतात.''
यंदाच्या सणासुदीत शरीरातील ग्लुकोज पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'या' गोष्टी फॉलो करा :
1. पौष्टिक आहार घ्या : कोणत्याही कार्यक्रमात जाण्याआधी तुम्ही तिथे गेल्यावर फॅट्स, साखर, तसेच गोड पदार्थांचे सेवन मर्यादित करा. दिवसभरात अगदी कमी प्रमाणात जेवण करा. तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. वेळीच डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्लाही घ्या.
2. रक्तातील साखरेच्या पातळी नियंत्रणात ठेवा : सुट्टीच्या दिवसांत तुमच्या जीवनशैली आणि आहारातही बदल होतात. ज्यामुळे नियमितपणे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. फ्रीस्टाइल लिब्रे सिस्टमसारखे ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईस जवळ असल्यास तुम्हाला या पातळ्यांवर देखरेख ठेवण्यास मदत होऊ शकते. फिंगर प्रिक्ससाठी सुलभ आणि वेदनारहित पर्याय म्हणून हे डिवाईसेस वेअरेबल सेन्सर्स वापरतात. ज्यामुळे तुम्हाला रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर देखरेख ठेवण्यास मदत होते. यामधून तुम्हाला धोकादायक आजार (हायपोग्लायसेमिया किंवा हायपरग्लायसेमिया) टाळण्यासाठी किंवा त्यासंबंधी काळजी घेण्यासाठी उत्तम सुविधा मिळू शकते.
3. झोपेच्या वेळा निश्चित करा : अनेकदा काही घरगुती समारंभ, पार्टी यामुळे रात्री झोपण्यास उशीर होतो. रात्री झोप कमी झाल्यामुळे त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. यासाठी झोपेचे वेळापत्रक तयार करा. दिवसातून किमान सात ते आठ तास झोप मिळणे गरजेचे आहे. अधिक झोपल्याने देखील इन्सुलिन प्रतिरोध वाढते, ज्यामुळे उठल्यानंतर तुम्हाला अधिक भूक लागते.
4. नियमित व्यायाम करा : तुम्ही जर नियमितपणे व्यायाम केला तर मधुमेह नियंत्रणात आणण्यास मदत होते. शारीरिक व्यायामासह पुन्हा उत्साहित होण्यासाठी तुम्ही चालणे, फूटबॉलसारखे सांघिक खेळ खेळणे, नृत्य (झुम्बा), सायकल चालवणे किंवा पोहणे असे व्यायाम करू शकता. याचे अनेक फायदे असू शकतात. जसे की, ऊर्जा पातळी वाढते, स्नायू बळकट होतात, फुफ्फुसाची क्षमता आणि रक्ताभिसरण वाढते, कोलेस्ट्रॉल पातळ्या कमी होतात, तणाव दूर होतो, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
5. हायड्रेटेड राहा : सामान्यत: हायड्रेटेड राहणे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डिहायड्रेशन टाळण्याकरिता अधिक प्रमाणात पाणी प्यावे, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण त्वरित कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )