Health Tips : 12 वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका; इतक्या कमी वयात हृदयविकाराची कारणं काय असू शकतात? वाचा सविस्तर
Health Tips : हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण साधारण: वृद्धांमध्ये दिसून येते. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुलांना देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Heart Attack in Childern : हृदयविकाराचा झटका (Heart Attack) ही एक जीवघेणी स्थिती आहे. हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण साधारण: वृद्धांमध्ये दिसून येते. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुलांना देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील राजकोटमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत तरुणांमध्ये हृदयविकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
द्वारकाच्या विजापूर गावात एका 12 वर्षाच्या मुलाचा त्याच्याच राहत्या घरात मृत्यू झाला. सहावीत शिकणारा हा मुलगा पहाटे साडेपाच वाजता घराच्या व्हरांड्यात बेशुद्धावस्थेत सापडला. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला कोरोनाची लस मिळालेली नाही. लहान मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण फारच दुर्मिळ असले तरी पालकांनी त्याबाबत सावध राहणं गरजेचं आहे.
मुलांमध्ये छातीत दुखण्याची कारणे :
Healthychildren.org नुसार, अनेक मुलांना मस्क्यूकोस्केलेटल छातीच्या दुखण्यामुळे छातीत दुखते. या वेदनेची सुरुवात छातीच्या स्नायू आणि हाडांपासून होते. जेव्हा छातीचे स्नायू आणि नसा दुखतात तेव्हा छातीत दुखू शकते. ही वेदना सतत येत राहते. याशिवाय खोकल्या दरम्यान छातीत दुखण्याची तक्रारही होऊ शकते. छातीच्या हाडांना जोडलेल्या स्नायूंमध्ये सूज आल्यानेही छातीत दुखू शकते.
शारीरिक श्रम, व्यायाम किंवा कोणतीही थकवा आणणारी क्रिया करताना छातीत दुखत असेल आणि दाब जात नसेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काम करण्याची क्षमता कमी होणे आणि छातीत दुखणे, बेशुद्ध होणे, जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांमध्ये छातीत दुखणे, तसेच हाय कॉलेस्ट्रॉल असलेल्या मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे छातीत दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
मुलांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?
लहान मुलांना हृदयविकाराचा झटका येणे ही सामान्य बाब नाही. पण, जर त्यांची कोरोनरी धमनी असामान्य असेल किंवा त्यांना हृदयाच्या स्नायूशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी ही हृदयाच्या स्नायूची एक स्थिती आहे. हा त्रास 200 पैकी अंदाजे 1 लोकांमध्ये असतो. यामुळे केवळ स्नायूंनाच नुकसान पोहोचत नाही, तर कालांतराने, यामुळे हृदयाला देखील धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉक्टरांकडे केव्हा जावे?
जर मुलाला आहारासंबंधी समस्या येत असतील, वारंवार थकवा जाणवत असेल, भूक लागत नसेल, मुलांचा स्वभाव चिडचिडा होत असेल, जुलाब, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, उलट्या होणे, हायपोटेन्शन आणि अशक्तपणा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )