Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?
Right Time To Check Weight : वर्कआउट केल्यानंतर लगेचच वजन तपासले तर ते बरोबर कळत नाही.
Right Time To Check Weight : वजन कमी करायचं असो किंवा वाढवायचं ते तपासण्यासाठी वजन काट्याचाच वापर केला जातो. मात्र, या वजन तंत्राचा वापर करताना वजनाचे माप जेव्हा प्रत्येक वेळी वेगळे येते. तेव्हा मात्र, खरा गोंधळ उडतो. यामुळे अनेकदा असे वाटते की जास्त खाल्ल्याने मशीन जास्त वजन दाखवते. तर, अनेकदा अपेक्षेपेक्षा कमी वजन दाखविले जाते. तुमचा देखील असाच गोंधळ होत असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती याबाबत माहिती सांगणार आहोत. चला, तर जाणून घेऊयात.
वीकेंड नंतर वजन तपासू नका
वीकेंडमध्ये बहुतेक लोक आवडत्या गोष्टी खातात आणि व्यायाम करणं टाळतात. अशा परिस्थितीत तुम्ही जर वीकेंडनंतर वजन चेक केले तर तुम्हाला त्याचं योग्य माप मिळत नाही आणि वजन जास्त दाखवलं जातं. जेव्हा जास्त वजन असते तेव्हा आत्मविश्वासाची कमतरता असते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
व्यायामानंतर लगेच वजन तपासणे टाळा
वर्कआउट केल्यानंतर लगेचच वजन तपासले तर ते बरोबर कळत नाही. खरंतर, व्यायामाने शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो. यामुळे वजनाचे मोजमाप अचूक होत नाही. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर लगेचच वजन करू नका.
मासिक पाळी आणि बद्धकोष्ठता दरम्यान वजन तपासू नका
मासिक पाळीत वजन तपासणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास कधीही वजन करू नका. कारण मासिक पाळीत शरीरात थकवा जाणवतो, त्यामुळे योग्य माप दाखवत नाही. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यावर देखील थकवा जाणवतो. या दोन्ही परिस्थितीत काही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे या दिवसांत वजन करणे टाळा.
वजन तपासण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
जर तुम्हाला तुमचे वजन तपासायचे असेल तर वजन तपासण्याची योग्य वेळ माहित असणं गरजेचं आहे. वजन तपासण्यासाठी सकाळची वेळ योग्य आहे. सकाळी फ्रेश झाल्यानंतर, तुम्ही तुमचं वजन तपासू शकता. कारण यावेळी पोट रिकामे असते आणि योग्य वजन किती आहे याचा अंदाज लावता येतो. त्यामुळे सकाळची वेळ योग्य आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :