Glaucoma Awareness Month : ग्लूकोमाचं वेळीच निदान व उपचार न झाल्यास अंधत्वाचा धोका
Glaucoma Awareness Month : काचबिंदू (Glaucoma) हा डोळ्यांचा एक गंभीर आजार असून त्यामुळे ऑप्टिक नर्व्हला इजा होते आणि परिणामी अंधत्व येते. जानेवारी महिना हा राष्ट्रीय काचबिंदू जागरुकता महिना म्हणून ओळखला जातो.
Glaucoma Awareness Month : काचबिंदू (Glaucoma) हा डोळ्यांचा एक गंभीर आजार (Eye Diseases) असून त्यामुळे ऑप्टिक नर्व्हला इजा होते आणि परिणामी अंधत्व येते. जानेवारी महिना हा राष्ट्रीय काचबिंदू जागरुकता महिना (Glaucoma Awareness Month) म्हणून ओळखला जातो. वेळीच काचबिंदूचे निदान झाल्यास यशस्वी उपचार करणे शक्य होते. तीव्र डोकेदुखी, डोळ्यांची अस्वस्थता, मळमळ, उलट्या, अंधुक दृष्टी, डोळ्यांचा लालसरपणा ही काचबिंदूची काही प्रारंभिक लक्षणे आहेत.
वेळीच उपचार न केल्यास अंधत्वाची भीती
घाटकोपरमधील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मेहुल संघवी म्हणाल्या की, काचबिंदूची सामान्यत: सुरुवातीला फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे, काचबिंदू असलेल्या केवळ 50 टक्के रुग्णांनाच त्यांच्या या स्थितीबद्दल माहिती असते. कालांतराने रुग्णाची दृष्टी हळूहळू कमी होऊ शकते. जनजागृतीअभावी बर्याच लोकांना त्यांच्या दृष्टीत होणारा बदल माहित नसतो कारण ही प्रक्रिया हळूहळू होते. काचबिंदूवर वेळीच उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते. त्याकरिता वेळीच निदान आणि तपासणी करणे सर्वात महत्वाचे ठरते. काचबिंदू कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींनी 40 वर्षांच्या वयानंतर दर 6 महिन्यांनी नियमित काचबिंदूची तपासणी करावी.
नियमित डोळ्यांची तपासणी करा
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नुसरत बुखारी म्हणाल्या की, "काचबिंदूच्या स्थितीबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढवणे महत्वाचे आहे, जे मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये अंधत्वाचे कारण आहे ज्यामुळे 40 टक्क्यांपर्यंत दृष्टी नष्ट होऊ शकते. नियमित डोळ्यांची तपासणी किंवा काचबिंदू चाचण्यांद्वारे वेळीच निदान करणे ही घातक स्थिती टाळण्यास मदत करु शकते."
मधुमेहामुळे काचबिंदूचा धोका वाढतो
डोंबिवलीतील एसआरव्ही ममता रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रीता चौधरी म्हणाल्या की, "डोळ्याला झालेली इजा, जळजळ किंवा कोणत्याही कारणामुळे रक्तस्त्राव झाल्यानंतरही काचबिंदू होऊ शकतो. जास्त वय असलेल्यांना काचबिंदूचा धोका जास्त असतो. मधुमेहामुळे काचबिंदूचा धोकाही वाढतो. सामान्यतः काचबिंदूची लक्षणे आढळत नाहीत. परंतु लालसरपणा, पाणी येणे, अंधुक दृष्टी, दिव्यांभोवती रंगीत हेलो दिसणे आणि डोळ्यात वेदना होणे असे दिसून येते. हे केवळ नियमित तपासणी आणि रोगाचे संपूर्ण मूल्यांकन करून निदान केले जाऊ शकते. काचबिंदू बरा होऊ शकत नाही, तो ऑप्टिक नर्व्हच्या परिणाम करतो आणि त्यांचा नाश करतो परिणामी कायमचे अंधत्व देखील येते. मज्जातंतू तंतू पुन्हा निर्माण होत नसल्यामुळे, त्याचे झालेले नुकसान पूर्ववत करता येत नाही. म्हणून वेळीच निदान आणि उपचार केल्याने या भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )