(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health News : कर्करोगाशी झगडत असलेल्या मुलांमध्ये हृदयविषयक समस्यांचा धोका अधिक, काय खबरदारी घ्यावी?
Health News : कर्करोगातून बचावलेल्या मुलांमध्ये, इतर लोकांच्या तुलनेत हृदय निकामी होण्याचे प्रमाण 15 पटींनी जास्त असते तर हृदयविकार होण्याची शक्यता आठ पट जास्त असते.
Health News : एखाद्या कुटुंबात लहान मुलाला कर्करोग (Cancer) झाल्याचे निदान होते, तेव्हा ती बातमी कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी असते. सुदैवाने, केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॉलेक्युलर लक्षित थेरपी आणि इम्युनोथेरपी या विविध उपचार पद्धतींमध्ये अलीकडे झालेल्या प्रगतीमुळे लहान मुलांमधील कर्करोगातून जगण्याचा एकंदर दर 80 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.
Childhood Cancer मधून बचावलेल्या मुलांमध्ये हृदय निकामी होण्याचं प्रमाण 15 पट
लहानपणी झालेल्या कर्करोगातून (Childhood Cancer) वाचलेल्या मुलांमध्ये जे भविष्यात परिणाम दिसतात, ते कॅन्सर पुन्हा उलटण्याचे. निदान आणि प्रतिबंध यावर तर अवलंबून आहेतच, शिवाय दिलेल्या उपचारातील गुंतागुंत लवकर जाणून त्यावर उपचार करण्यावर देखील अवलंबून आहेत. काही केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी औषधोपचार तसेच रेडियोथेरपीचे कार्डिओटॉक्सिक परिणाम असतात, जे नाजूक रुग्णांमध्ये हृदय निकामी (Heart Failure) करु शकतात. असे अनुमान आहे की, लहानपणी कर्करोगातून बचावलेल्या मुलांमध्ये, इतर लोकांच्या तुलनेत हृदय निकामी होण्याचे प्रमाण 15 पटींनी जास्त असते तर हृदयविकार होण्याची शक्यता आठ पट जास्त असते.
काय खबरदारी घ्यावी?
डॉ. सुप्रतिम सेन-वरिष्ठ सल्लागार पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट-एनएचएसआरसीसी-चिल्ड्रन्स हॉस्पिटल सांगतात की, हृदयाच्या समस्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात काही साध्या चाचणींच्या मदतीने ओळखता येतात आणि ती समस्या वाढू न देण्यासाठी आणि हृदयविषयक झालेले बदल पूर्ववत करण्यासाठी या रुग्णांना कार्डियाक उपचार सुरु करता येतात. सीरियल ट्रान्सथोरॅसिक इकोकार्डिओग्राफीवर आपण हृदयाच्या पंपिंग कार्यावर, हृदयातून प्रत्येक वेळी बाहेर पडणार्या रक्ताच्या मात्रेवर (इंजेक्शन फ्रॅक्शन) लक्ष ठेवू शकतो. नव्या प्रगत इको मशीन्समुळे आपण स्नायूंचे आकुंचन आणि ग्लोबल लॉन्गिट्युडीनल स्ट्रेन यांच्यातील समतोल मापू शकतो. नेहमीच्या सीरियल इकोवर इंजेक्शन फ्रॅक्शन किंवा ग्लोबल लॉन्गिट्युडीनल स्ट्रेन यांच्यात घट दिसल्यास पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजी टीमला सूचित करायचे, म्हणजे त्यानुसार उपचारांमध्ये बदल करता येतात आणि हृदयाची आणखी हानी होण्याचे टळते.
पेडियाट्रिक कार्डिओ-ऑन्कॉलॉजी हे तसे नवे बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे, जे लहानपणी कर्करोगातून बचावलेल्या मुलांमध्ये तात्काळ आणि कालांतराने दिसणार्या हृदयावरील प्रभाव आणि परिणामाबाबत विचार आणि उपचार करते. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या 'डिसेंबर 2022 मध्ये झालेली वाढ' या लेखात एका तज्ज्ञ समुहाद्वारे करण्यात आलेल्या पेडियाट्रिक कार्डिओ-ऑन्कॉलॉजी शिफारसींची रुपरेषा दिली आहे. या अभ्यासात उपचारांचा भाग म्हणून घेतलेल्या किंवा घेणार असलेल्या रेडियोथेरपी आणि केमोथेरपीच्या डोसच्या संख्येवरुन तसेच, ज्यांना जन्मजात हृदयविकार किंवा काही हृदयविषयक समस्या आहेत, त्यावरुन अधिक जोखीम असलेल्या रुग्णांची व्याख्या करण्यात आली आहे. या अभ्यासात अशा रुग्णांचे नियमित कार्डिओलॉजी पुनरावलोकन करणे तसेच बीपीबाबत निरीक्षणे, इसीजी आणि ट्रान्सथोरॅसिक इकोकार्डिओग्राफी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या रुग्णांना स्थूलता, शारीरिक हालचाली, निरोगी आणि पौष्टिक आहार आणि धूम्रपान टाळण्याचे फायदे याबाबत माहित करुन त्यामुळे काही संभाव्य हृदयविकारविषयक धोके कसे टाळता येऊ शकतात हे देखील या अभ्यासात सांगितले आहे.
शेवटी, या अभ्यासात औषधोपचाराच्या दोन समुहांची शिफारस केली आहे. कार्डिओटॉक्सिक औषधे मोठ्या प्रमाणात घेणार्या अधिक जोखीम असलेल्या रुग्णांसाठी कार्डिओप्रोअॅक्टिव्ह एजंट म्हणून डेक्स्राझोक्सेन; आणि हार्ट फेल्युअर आणि व्हेन्ट्रीक्युलर कार्यात घट झाली असल्यास पसंतीचे औषध म्हणून ACE इनहिबिटर्स. पेडियाट्रिक कॅन्सर रुग्णांच्या बचावाच्या दरातील सुधारणेबरोबरच कार्डियाक सेक्विली (पूर्वी झालेल्या रोगाचे परिणाम) चे लवकर निदान आणि प्रतिबंध करणे हा या रुग्णांच्या दीर्घकालीन देखभालीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पैलू ठरु शकतो.
- डॉ. सुप्रतिम सेन-वरिष्ठ सल्लागार पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, एनएचएसआरसीसी- चिल्ड्रन्स हॉस्पिटल
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )