Health News : मुंबईतील अतिप्रदूषित हवामानामुळे अस्थमाचे रुग्ण वाढले, काय काळजी घ्यावी?
Health News : मुंबईतील हवेची गुणवत्ता ही अतिखराब झालेली आहे.अशा परिस्थितीत आपल्याला ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा लोकांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी
Health News : मुंबईतील (Mumbai) हवेची गुणवत्ता ही अतिखराब झालेली आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे जागोजागी सुरु असलेले कन्स्ट्रक्शन आणि दुसरे रस्त्यावरील वाहनांचे वाढलेले प्रमाण ज्यामुळे मुंबईचे प्रदूषण (Air Pollution) दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. यामुळे ओपीडीमध्ये (OPD) किमान 2 ते 3 रुग्ण असे आढळतात ज्यांना अस्थमाचा (Asthma) त्रास होत आहे ज्यामुळे त्यांना अॅडमिट करण्याची वेळ येते. किमान 8 ते 10 रुग्ण असे असतात जे ओपीडीमध्ये उपचार घेऊन घरी जाऊ शकतात. आतापर्यंत अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती पण आताच्या अतिप्रदूषणामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा लोकांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी, असं मुंबई सेंट्रल इथल्या वोक्हार्ड हॉस्पिटलमधील डॉ. हनी सावला ( कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन) यांनी सांगितलं.
ते पुढे सांगतात की, "या प्रदूषणामुळे ज्यांना आजपर्यंत कधीही अस्थमाचा त्रास जाणवला नव्हता असे अस्थमाचा अटॅक आलेले आणि अस्थमाची सुरुवात झालेले 20 ते 25 वयोगटातील रुग्णही आढळून येत आहेत. या प्रदूषणामुळे आयसीयूमध्ये फुफ्फुसाच्या आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि या परिस्थितीवर आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि योग्य ती खबरदारी बाळगली पाहिजे."
लक्षणे
खोकला आणि कफ - यामध्ये सफेद किंवा पिवळ्या रंगाचा कफ आणि सतत खोकला येणे, चालताना किंवा जिने चढताना धाप लागणे ही लक्षणे आपल्याला सांगतात की या रुग्णाला फुफ्फुसाचा आजार उद्भवला आहे.
ज्या व्यक्ती आजारी आहेत, ज्यांची किमोथेरपी सुरु आहे, ज्यांची प्रत्यारोपण शस्त्रकिया झालेली आहे अशा रुग्णांमध्ये ताप आणि निमोनियाचे प्रमाण वाढले आहे. अशा रुग्णांना त्रास जाणवल्यास त्वरित हॉस्पिटल मध्ये दाखल करुन योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. जर योग्य उपचार घेतले नाहीत तर हे धोकादायक होऊ शकते.
कोणती खबरदारी घ्यावी?
हे रोखण्यासाठी आपल्याला कोविडशी लढत असताना घेतली खबरदारी घेणे गरजेचे आहे, जसे मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी. जेणेकरुन आपण संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकू.
जर तुम्हाला ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस सर्दी, खोकला, ताप असल्यास घरगुती उपाय करुन देखील आराम येत नसेल तर घाबरुन न जाता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेले औषोधोपचार सुरु करावे, जेणेकरुन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असल्याने त्यांना न्युमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी त्यांना न्युमोनियाचे लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. याव्यतिरिक्त गरम पाणी पिणे, गुळण्या करणे, हळदीचे दूध पिणे असे घरगुती उपायही गरजेचे आहेत, जेणेकरुन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
या प्रदूषणावरती आळा घालण्यासाठी आपल्या सर्वाना एकत्र येऊन वाढणारे कन्स्ट्रक्शन, रस्त्यावरील वाढलेल्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. यावर जर नियंत्रण ठेवले नाही तर मोठ्याप्रमाणात फुफ्फुसाचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )